राजस्थानमधील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची मुसंडी, भाजपाला अपक्षांपेक्षा कमी जागा
By बाळकृष्ण परब | Published: December 14, 2020 07:58 AM2020-12-14T07:58:03+5:302020-12-14T08:00:44+5:30
Rajasthan Election : राजस्थानमधील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे.
जयपूर - राजस्थानमधील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसला एकूण ६२० प्रभागांमध्ये विजय मिळाला आहे. तर भाजपा तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. भाजपाला ५४८ प्रभागांत विजय मिळाला. भाजपापेक्षा अधिक प्रभागांमध्ये अपक्षांनी बाजी मारली. अपक्ष उमेदवारांना ५९५ प्रभागांत विजय मिळाला.
राजस्थानमधील ५० शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ११ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. एकूण १७७५ प्रभागांमध्ये ही निवडणूक झाली होती. निवडणूक आयुक्त पी.एस. मेहरा यांनी सांगितले की, ११ डिसेंबर रोजी ५० स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान झाले होते. ज्यामध्ये एकूण ७९.९० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीची मतमोजणी रविवारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्यालयांमध्ये झाली. या मतमोजणीत एकूण १७७५ प्रभागांच्या मतमोजणीत काँग्रेसला ६२० तर भाजपाला ५४८ ठिकाणी विजय मिळाला. बसपाला ७, सीपीआयला २, सीपीआय (एम), आरएलपीचा एक आणि ५९५ अपक्षांना विजय मिळाला.
दरम्यान. या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये गहलोत म्हणाले की, नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा. काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून काँग्रेसला विजयी केल्याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो.
नगर पालिका और नगर परिषद चुनावों में जीते सभी प्रत्याशियों को हार्दिक बधाई और शुभकामनायें देता हूं। मैं प्रदेश की जनता का आभार व्यक्त करता हूं जिन्होंने कांग्रेस पार्टी पर अपना भरोसा जताया और कांग्रेस को जीत दिलाई।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) December 13, 2020
दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सतीश पुनिया यांनी सांगितले की, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने दिखाऊ आनंद व्यक्त करावा. मात्र राज्यात सत्ता असतानाही भाजपा आणि अपक्षांची संख्या एकत्र केली तर हा जनादेश नक्कीच सत्ताविरोधी आहे.