जम्मू-काश्मीर- भाजपा आणि पीडीपी सरकारचा 30 एप्रिल रोजी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. या दरम्यान जम्मू-काश्मीर विधानसभा अध्यक्ष कविंद्र गुप्ता आणि दुस-या एका आमदारानं मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे कथुआ सामूहिक बलात्कारातील आरोपीच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभाग घेतलेल्या आमदाराच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ टाकण्यात आली.आमदार राजीव जसरोटिया यांना मंत्री बनवण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये चर्चित असलेल्या कथुआ सामूहिक बलात्कारातील आरोपींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत राजीव जसरोटिया दिसले होते. तरीही त्यांना मंत्री बनवण्यात आलं आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीनं यासंदर्भात राजीव जसरोटिया यांना काही दिवसांपूर्वी प्रश्नही विचारला होता. त्यावेळी मी रॅलीत सहभागी झालो नसल्याचं जसरोटिया यांनी सांगितलं होतं. खरं तर आरोपींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत सहभाग घेतल्यामुळे भाजपाच्या दोन मंत्र्यांना यापूर्वीच राजीनामा द्यावा लागला होता. भाजपा मंत्री लाल सिंह आणि चंद्र प्रकाश गंगा यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच राजीनामा दिला होता.या मुद्द्यावरून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही जम्मू-काश्मीर सरकारवर हल्लाबोल केला होता. ओमर अब्दुल्ला यांनी टि्वट करत म्हटलं होतं की, कथुआ सामूहिक बलात्कारातील आरोपींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभाग घेतल्यामुळे भाजपाच्या दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. परंतु जो एक आमदार रॅलीमध्ये सामील होता, त्याला मंत्री बनवण्यात आलं आहे. भाजपा आणि मेहबुबा मुफ्ती कथुआ सामूहिक बलात्कारातील भूमिकेवरून संभ्रमावस्थेत का आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपानं जम्मू-काश्मीर विधानसभा अध्यक्ष कविंद्र गुप्ता यांना मंत्री बनवलं आहे.
अजब न्याय भाजपाचा... कथुआतील आरोपींचं समर्थन करणाऱ्या आमदाराला मंत्रिपदाची 'बक्षिसी'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 6:00 PM