दिल्लीतील राजेंद्र नगर येथील राव आयएएस कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई सुरू आहे. याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. गेटला धडकणारं वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे. रविवारी दिल्ली पोलिसांनी कोचिंग सेंटरच्या मालक आणि कॉर्डिनेटरला अटक केली.
पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक केली आहे. राजेंद्र नगर दुर्घटनेबाबत दिल्ली पोलिस एमसीडीला नोटीसही बजावणार आहेत. एमसीडीच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. सध्या दिल्ली पोलीस कोचिंग सेंटरशी संबंधित पेपर्स तपासण्यात व्यस्त आहेत.
या प्रकरणाबाबत आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले की, अनेक कोचिंग सेंटर्स बेसमेंटमध्ये बेकायदेशीरपणे क्लास चालवतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. दिल्लीतील मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीचा व्हिडीओ पावसापूर्वीचा आहे. यामध्ये ते पाणी साचण्याबाबत बोलत आहेत. भाजपा एलजीसोबत कट रचण्यात व्यस्त आहे.
"दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी"
याशिवाय या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असं भाजपाचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं. कारण दिल्ली पाणीपुरवठा विभाग हा दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी दिल्ली पाणीपुरवठा विभागाची होती, त्यामुळे दिल्ली सरकार जबाबदार आहे.