उत्तर प्रदेश- संपूर्ण देशभरात गाजलेल्या आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयानं आरोपी राजेश व नुपूर तलवार यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने 26 नोव्हेंबर 2013 रोजी आरुषीचे आई-वडील राजेश आणि नुपूर तलावर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात राजेश आणि नुपूर तलवार यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आज सुनावणी झाली असता, न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. राजेश आणि नुपूर तलवार सध्या गाजियाबादच्या डासना जेलमध्ये तुरुंगवास भोगत आहेत.न्यायमूर्ती बी. के. नारायण आणि न्यायमूर्ती एके मिश्रा यांच्या खंडपीठाने 7 सप्टेंबरला आरुषी व हेमराज हत्या प्रकरण निर्णय राखून ठेवला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी ऑनर किलिंगमधून या दोन्ही हत्या झाल्याचा निष्कर्ष काढला होता. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री मायावतींनी हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवले होते. सीबीआय न्यायालयाने 26 नोव्हेंबर 2013 रोजी आरुषीचे आई-वडील राजेश आणि नुपूर तलावर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. परंतु अलाहाबाद न्यायालयानं आज त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
काय आहे आरुषी व हेमराज हत्या प्रकरणआरुषी तलवार दाम्पत्याची एकुलती एक मुलगी होती. नोएडा जलवायू विहार एल-32 मध्ये हे कुटुंब राहत होते. 16 मे 2008च्या सकाळी आरुषी तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली. तिची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. तलवार यांच्या घरी काम करणारा नोकर हेमराज गायब असल्याने सर्वप्रथम त्याच्यावर हत्येचा संशय होता. पण दुस-या दिवशी 17 मे रोजी घराच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह सापडला. या प्रकरणात न्यायालयाने आरुषीच्या आई-वडिलांना दोषी ठरवले असले तरी, अजूनही या संपूर्ण प्रकरणाबद्दल रहस्य कायम आहे.