NIT मधून B.Tech, कोण आहेत राजेश धर्मानी? सुखू मंत्रिमंडळात होणार सामील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 10:50 AM2023-12-12T10:50:45+5:302023-12-12T10:51:29+5:30
Himachal Pradesh Cabinet Expansion : बिलासपूरमधील घुमारवी येथील काँग्रेसचे आमदार राजेश धर्मानी आमि कांगडामधील आमदार यादविंदर गोमा यांना मंत्रिपद मिळणार आहे.
हिमाचल प्रदेशातील मंत्रिमंडळ विस्ताराचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात येत आहे. मंगळवारी (दि.१२) दुपारी मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. यासाठी नवीन मंत्र्यांचा दुपारी शिमला येथील राजभवनात शपथविधी सोहळा होणार आहे. बिलासपूरमधील घुमारवी येथील काँग्रेसचे आमदार राजेश धर्मानी आमि कांगडामधील आमदार यादविंदर गोमा यांना मंत्रिपद मिळणार आहे.
दरम्यान, राजेश धर्मानी हे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या जवळचे मानले जातात. राजेश धर्मानी यांचा जन्म २ एप्रिल १९७२ रोजी बिलासपूरच्या घुमारवी येथे झाला. राजेश धर्मानी हे एनआयटी (NIT) हमीरपूरचे पासआउट आहेत. त्यांनी येथून बी.टेक (सिव्हिल) केले आहे. ते प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव, युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहिले आहेत. तसेच, आमदार राजेश धर्मानी हे संवेदना चॅरिटेबल सोसायटीचे संस्थापक सदस्य आहेत. ही संस्था गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करते.
राजेश धर्मानी यांनी २००७ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. या निवडणुकीत त्यांनी काका कर्मदेव यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१२ मध्येही त्यांनी निवडणूक जिंकली. दरम्यान, २०१७ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. बिलासपूर जिल्ह्यातील पाच विधानसभा जागांपैकी काँग्रेसला फक्त घुमारवी जागा जिंकता आली आहे, ही मोठी गोष्ट आहे. याचबरोबर, राजेश धर्मानी यांच्याकडे जवळपास एक कोटी रुपयांची संपत्ती आहे. निवडणुकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली होती.
दरम्यान, राजेश धर्मानी हे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या जवळचे मानले जातात. कारण ते दिवंगत मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या विरोधकांमध्येही होते. राजेश धर्मानी यांना सरकार स्थापनेबरोबरच सुखू यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार होते, पण त्यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही. त्यामुळे ते पहिल्यांदा झालेल्या मंत्रिपदाच्या शपथविधीलाही गेले नाहीत.