चेन्नई: भाजपा मला रसद पुरवत असल्याची चर्चा अनेकदा केली जाते. परंतु, माझ्या पाठिशी भाजपा नव्हे तर देव आणि जनता आहे. तुम्ही मला कितीही वेळा हा प्रश्न विचारला तरी माझे उत्तर एकच असेल, असे सुपरस्टार रजनीकांत यांनी स्पष्ट केले. ते मंगळवारी चेन्नईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विश्व हिंदू परिषदेकडून (विहिंप) राज्यात काढण्यात येणाऱ्या रामराज्य रथ यात्रेसंदर्भात भाष्य केले. त्यांनी म्हटले की, तामिळनाडू हे एक निधर्मी राज्य आहे. याठिकाणची शांतता भंग होईल, अशी कोणतीही गोष्ट रोखणे आपले कर्तव्य आहे. मला आशा आहे की, पोलीस आणि प्रशासन राज्यातील धार्मिक एकोपा जपण्यासाठी योग्य ती पावले उचलतील, असे रजनीकांत यांनी सांगितले. तसेच रजनीकांत यांनी पेरियार यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांनाही फटकारले. मी या घटनेचा निषेध करतो. हे दुसरे-तिसरे काहीही नसून शुद्ध रानटीपणा आहे. हे घडायला नको होते, असेही रजनीकांत यांनी सांगितले. रजनीकांत हे हिमालयात धार्मिक पर्यटनासाठी गेले होते. त्यांनी 31 डिसेंबर 2017 रोजी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा केली होती. परंतु, ते राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाले नव्हते. याबाबत विचारले असता, त्यांनी म्हटले की, मी स्वत:ला राजकारणात पूर्णपणे गुंतवून घेतल्याशिवाय दैनंदिन घडामोडींवर भाष्य करू शकत नाही. मला आणखी कितीवेळा ही गोष्ट तुम्हाला सांगावी लागेल, ते माहिती नाही, असे रजनीकांत यांनी प्रसारमाध्यमांना सुनावले.
भाजपा मला रसद पुरवत असल्याची चर्चा खोटी- रजनीकांत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 8:48 PM