ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 23 - दक्षिणेतले सुपरस्टार रजनीकांत यांच्या संभाव्य राजकीय प्रवेशावरुन आतापासूनच तामिळनाडूत जोरदार राजकारण रंगण्यास सुरुवात झाली आहे. रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करु नये यासाठी विरोधकांनी काल त्यांच्या घराबाहेर आंदोलन केल्यानंतर आज त्याला उत्तर देण्यासाठी रजनीसमर्थकांनी मोर्चा काढला होता. चेन्नईच्या वॉशरमनपेठ भागात मंगळवारी सकाळी रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाचे समर्थन करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता.
मागच्या आठवडयात रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांबरोबर भेटीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले होते. सध्याच्या परिस्थितीत राज्यव्यवस्था लोकांचा विचार करत नाहीय. हे चित्र बदलले पाहिजे. तुमच्यासारख्याच माझ्यावर जबाबदा-या, काम आहे. आपण आपले काम करत राहू पण जेव्हा वेळ येईल तेव्हा युद्धासाठी तयार रहा असे रजनी आपल्या समर्थकांना म्हणाले होते. या दौ-यात त्यांनी नाव न घेता द्रमुकवरही टीका केली होती. त्यानंतर रजनी यांच्या राजकीय प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
मागच्या चार दशकातील तामिळनाडूचा इतिहास बघितला तर, लोकप्रिय व्यक्तींनीच इथले सत्ता सिंहासन संभाळले आहे. दिवगंत मुख्यमंत्री जयललिता यांचे अकाली निधन आणि वृद्धापकाळाने राजकारणात सक्रीय नसलेले करुणानिधी यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरुन काढण्याची क्षमता रजनीकांत यांच्यामध्ये आहे. त्यामुळे रजनी यांचे असंख्य चाहते त्यांच्या राजकीय प्रवेशाची वाट पाहत आहेत. पण त्याचवेळी विरोधकांनी त्यांनी कानडी असण्याचा मुद्दा उपस्थित करुन रजनी यांच्या राजकीय प्रवेशाला विरोध केलाय. रजनीकांत कन्नड आहेत, त्यामुळे त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणापासून दूर राहावं अशी मागणी करत काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रजनी यांच्या चेन्नईतील पोझ गार्डन येथील निवासस्थानाबाहेर त्यांचा पुतळा जाळला.
रजनीकांत यांच्या दक्षिणेतील कमालीच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या राजकारणातील प्रवेशाचे भाकीत वारंवार वर्तवण्यात येत असते. त्याच पार्श्वभूमीवर रजनीकांत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचीही चर्चा होती. गेल्या आठवड्यात चाहत्यांशी संवाद साधताना रजनीकांत यांनी त्यांना मोठ्या लढ्यास तयार राहण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन रजनी यांच्या राजकीयदृष्ट्या सक्रिय होण्याचे संकेत मानले जात आहे. मी पक्का तामिळीच आहे. जर तामिळी लोकांनी स्वीकारले नाही तर मी थेट हिमालयात जाईन, असे रजनीकांत यांनी म्हटले होते.
Chennai:Rajinikanth supporters march in his support, hold counter protest in Washermanpet in response to yesterday's protest by certain grps pic.twitter.com/HAYJjk1V22— ANI (@ANI_news) May 23, 2017