चेन्नई - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना चित्रपटातील योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सोमवारी गौरविण्यात आले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर, दोन-तीन दिवसांतच रजनीकांत यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे, चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीचे हेल्थ बुलेटीन आले असून काळजी करण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांनी म्हटलं आहे.
रजनीकांत यांना थकवा जाणवत होतो, तसेच चक्कर येत असल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. येथील कावेरी रुग्णालयात त्यांच्या अनेव वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी, डॉक्टरांनी कार्टोइड आर्टरी रिवास्कुलराइजेशन करण्याचा सल्ला दिला आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, अशी आशाही अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे, चाहत्यांनाही दिसाला मिळाला आहे.
दरम्यान, रजनीकांत यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार स्विकारला. मात्र, राजधानी दिल्लीतील या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे, रजनीकांत यांनी या दोन्ही प्रमुखांची भेट घेतली. रजनीकांतने ट्विटरवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शुभेच्छा मिळाल्याने आनंद झाल्याचे म्हटले.
रजनीकांत यांच्यासोबत या भेटीत त्यांच्या पत्नी लता रजनीकांत ह्याही उपस्थित होत्या. दरम्यान, रजनीकांत यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार आपले गुरू दिवंगत चित्रपट निर्माते बालाचंदर यांच्यासह अनेकांना समर्पित केला आहे. रजनीकांत हे राजकारणात येणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, आपण राजकारणात येणार नसल्याचं रजनीकांतने सांगितले.