नवी दिल्ली - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत स्वतःचा पक्ष काढून तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची त्यांनी आज चेन्नईत स्पष्ट केलं. त्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सिनेजगतासह सर्वच ठिकाणाहून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पण भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र रजनीकांत यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली आहे. रजनिकांत हे अशिक्षित असून त्यांना फक्त माध्यमांनीच मोठं केलं असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच तामिळनाडूची जनता चाणाक्ष असून, त्यांना हे सर्व लक्षात येईलच असेही स्वामी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रजनीकांत यांनी स्वामी यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केलं असून सध्याचे राजकारणी लोकशाहीच्या नावाखाली पैसे आणि जमिनी बळकावत आहेत. हीच परिस्थिती बदलत तामिळनाडूच्या राजकीय व्यवस्थेत आपल्याला काही महत्त्वाचे बदल घडवून आणायचे आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
रजनीकांत यांनी आज आपल्या राजकीय प्रवेशाची घोषणा केली आहे. ते लवकरच आपल्या पक्षाचं नावही जाहीर करणार आहेत. रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही रजिनकांत यांचं अभिनंदन केलं.
तामिळनाडूमधील भाजपाला आपली स्थिती माहित आहे. जर भाजपा तामिळनाडूमध्ये रजनीकांत यांच्या पक्षासोबत युती करणार असेल तर पक्षाच्या बैठकीमध्ये मी त्याला विरोध करणार असल्याचे ट्विटही स्वामी यांनी केलं आहे.
नाताळानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या चाहत्यांच्या मेळाव्यात रजनीकांत म्हणाले होते की, राजकारणातील अडचणी मला माहीत आहेत. मला त्यांची कल्पना नसती तर मी राजकारणात यापूर्वीच उडी घेतली असती. युद्धात उतरायचे तर ते जिंकण्यासाठीच उतरायचे असते. युद्ध जिंकण्यासाठी केवळ शक्ती नव्हे, तर युक्तीही लागते. याआधी आपण सन 1996मध्ये द्रमुकला मते देऊन जयललिता यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन केले होते. त्याचा संदर्भ देत रजनीकांत म्हणाले, खरेतर मी त्याच वेळी राजकारणात उतरलो होतो. त्यामुळे राजकारण मला नवीन नाही.