ऑनलाइन लोकमतचेन्नई, दि. 25 - देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतीपदासाठी अनेक नावांची चर्चा असतानाच दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावाची या चर्चेमध्ये भर पडली आहे. आपल्या अभिनयाने देशालाच नव्हे तर जगाला भुरळ पाडणार्या "सुपरस्टार" अभिनेता रजनीकांत भाजपाकडून राष्ट्रपती पदाचा उमेद्वार असू शकतात. वन इंडिया, टॉलिवूड न्यूज तसेच तेलगू सिनेमा यांच्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतीपदासाठी रजनीकांत यांच्या नावाचा विचार करत आहेत. प्रणव मुखर्जींचा राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ 25 जुलैला संपत असून, त्यापूर्वी त्यांच्या पर्यायाची निवड होणे आवश्यक आहे. मोदीपूर्व काळातील लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी किंवा कारिया मुंडा यासारखी अनेक नावे आता मागे पडली आहेत.
रजनीकांत यांना राष्ट्रपती पदासाठी समोर आणून भाजपा तमिळनाडूसह दक्षिण भारतात आपले वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करु शकते. तमिळनाडूसह, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगनामध्ये रजनीकांत यांना देव मानले जाते. त्यांच्या एका शब्दामुळे तेथील राजकीय समिकरणे बदलतात. त्यामुळेच दक्षिण भारतात आपली ताकद वाढवण्यासाठी भाजपा रजनीकांत यांच्या नावाचा विचार करत असल्याचे वृत्त आहे.
रजनीकांतचा चाहतावर्ग दक्षिणेत मोठ्या प्रमाणावर आहे. रजनीकांत हा तामिळनाडूतच नव्हे तर जगभरात आपल्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. रजनीकांतने अनेक सामाजिक प्रश्नांबद्दल राज्य सरकारकडे आवाज उठवला होता. मात्र त्यांनी स्वतः कधीही राजकारणात पाऊल ठेवलेलं नाही.
भाजपा सरकार वेगळे निर्णय घेण्यात माहिर आहे. 2002 साली वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मिसाईल मॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपतिपदासाठी पाठिंबा दिला होता. त्यावेळी पक्षाला रा.स्व. संघाच्या पठडीतील उमेदवाराची सहज निवड करता आली असती. पण पक्षाने त्यावेळी तसे काही केले नाही. उलट कलाम यांनी भाजपाला सन्मान मिळवून दिला. ते मुस्लीम असूनही त्यांनी समान नागरी कायद्याचे समर्थन केले होते. हा विषय अनेक वर्षांपासून भाजपाचा जिव्हाळ्याचा ठरला होता. कलाम यांच्या राष्ट्रपतिपदासाठी केलेल्या निवडीमुळे वाजपेयींच्या मंत्रिमंडळाला स्थानिक तसेच जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळण्यास मदतच झाली होती.
दोन्ही सभागृहांचे मिळून 776 खासदार आणि राज्यांचे 4120 आमदार यांची एकत्रित मतसंख्या 10,98,882 इतकी आहे. (प्रत्येक आमदाराला राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मते दिली जातात.) त्याच्या अर्धी म्हणजे 5,49,442 इतकी मते सध्याच्या रालोआकडे आहेत आणि प्रत्येक निवडणुकीनंतर त्यात भर पडत आहे. तेव्हा नवीन राष्ट्रपती हा भाजपाने निवडलेलाच राहणार यात तीळमात्र शंका नाही.
73 वर्षाचे कॅबिनेट मंत्री थावरचंद गहलोत या दलित व्यक्तीचाही राष्ट्रपतीपदासाठी विचार करण्यात येत आहे. तसेच मायावतींच्या जाटव जातीचे सत्यनारायण जातिया हे आणखी एक नाव आहे. याशिवाय एखादी अज्ञात दलित व्यक्ती राष्ट्रपतिपदासाठी अचानक समोर येऊ शकते. यंदाची राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही महाभारतातील उद्योगपर्वासारखी होऊ शकते.
- शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदासाठी डाव्यांची मोर्चेबांधणीभाजपाच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्ष ताकदवान उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळे साहजिकच शरद पवारांच्या नावाला पुन्हा एकदा राजकीय ताकद मिळाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी डाव्या पक्षांनी पवारांना सर्वाधिक पसंती दिली आहे. राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांकडून पहिल्यांदा संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता त्यांचं नाव अचानक मागं पडलं असून, शरद पवारांचं नाव आघाडीवर आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात आणि सीताराम येच्युरी यांनी शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी पवारांची भेटही घेतली आहे.रजनीकांतच्या एका वक्तव्यामुळे झाला होता जयललितांचा दारुण पराभव - रजनीकांत यांनी 1996 रोजी केलेल्या एका वक्तव्यामुळे जयललितांचा दारुण पराभव झाला होता. "जयललिता यांना जर सत्ता मिळाली, तर देवही तामिळनाडूला वाचवू शकणार नाही," असं वक्तव्य रजनीकांत यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर 1996 ची निवडणूक जयललिता हारल्या होत्या. मात्र 10 वर्षानंतर रजनीकांत यांचं मत बददलं आणि जयललितांचं कौतुक करताना "अष्टलक्ष्मीचा अवतार" असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र यानंतरही दोघांचं घर जवळ असूनही रजनीकांत यांनी जयललितांपासून अंतरच ठेवलं. 2014 रोजी लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदींसोबत झालेल्या भेटीनंतरही रजनीकांत राजकारणात सक्रीय होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र रजनीकांत यांनी यासाठी नकार दिला.