ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - भारतामध्ये बिग बजेट चित्रपट तयार करायचं ठरलं तर त्यात सर्व काही परदेशी असतं. म्हणजे सांगायचं झालं तर पर्यटन स्थळं, लोकेशन्स, तंत्रज्ञ, व्हिजुअल इफेक्ट्स टेक्नॉलॉजी सर्व काही परदेशीच असतं. पण दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट रोबोटचा सिक्वेल "रोबोट 2.0" ने मात्र ही परंपरा मोडीत काढली आहे. या चित्रपटाचं सर्व शुटिंग भारतात झालं आहे. या चित्रपटाचे सर्व तंत्रज्ञ भारतीय असून वीएफएक्स देखील भारतातच करण्यात आलं आहे.
रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेला "रोबोट 2.0" भारतातील आत्तापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. ऑक्टोबर महिन्यात वेगवेगळ्या सात भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये जापानी, कोरिया आणि मंदारीन भाषांचा समावेश आहे. 350 कोटी खर्च करुन तयार करण्यात आलेला हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "मेक इन इंडिया" थीमवर आधारित असेल असं चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं आहे.
"मेक इन इंडिया" पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतात पायाभूत सुविधा उभारणं मोदींचं लक्ष्य आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महिन्यांपूर्वी रजनीकांत यांच्याशी फोनवरुन बातचीत केली होती. त्यावेळी नुकतंच चित्रपटावर काम सुरु झालं होतं. हा चित्रपट "मेक इन इंडिया" थीमला प्रोत्साहन देऊ शकते असा सल्ला यावेळी पंतप्रधान मोदींनी दिला होता.
"रोबोट 2.0" चे निर्माता लिका प्रोडक्शनचे सीओओ राजू महलिंगम यांनी चित्रपटाचं सर्व शुटिंग दिल्ली आणि चेन्नईत झाल्याचं सांगितलं आहे. "आमचं मुख्य कार्यालय ब्रिटनमध्ये आहे. मात्र आम्ही यावेळी संपुर्ण शुटिंग भारतात करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट भारताचा क्राऊचिंग टायगर आणि हिडन ड्रॅगन ठरेल. या चीनी चित्रपटांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली होती", असंही ते बोलले आहेत.
चित्रपटाच्या क्लायमॅक्सचं शुटिंगही जवाहरलाल नेहरु स्टेडिअम आणि चेन्नईच्या ईव्हीपी फिल्म सिटीत पार पडल्याचंही राजू महलिंगम यांनी सांगितलं आहे.
चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी ए आर रहमान यांनी पेलली असून नीरव शाह यांनी सिनेमेटॉग्राफर तर श्रीनिवास मोहन यांनी वीएफएक्स डिझायनरची जबाबदारी निभावली आहे. साऊंड इंजिनिअर म्हणून रसूल पुकुट्टी यांनी काम पाहिलं आहे. स्लमडॉग मिलेनिअरसाठी त्यांनी ऑस्कर पटकावलेला आहे. खिलाडी अक्षय कुमार चित्रपटात व्हिलनच्या भुमिकेत दिसणार आहे. अक्षयचा "टॉयलेट - एक प्रेम कथा" चित्रपटदेखील यावर्षी रिलीज होणार आहे. हा चित्रपट स्वच्छ भारत अभियानावर आधारित आहे.