राजीव गांधी फाऊंडेशनच्या चौकशीचे आदेश, ED चे वरिष्ठ अधिकारी करणार तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 11:52 AM2020-07-08T11:52:43+5:302020-07-08T11:54:12+5:30
भाजपाकडून काही दिवसांपूर्वी राजीव गांधी फाऊंडेशनला चीनी दुतावासाकडून आर्थिक मदत म्हणजे डोनेशन मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता.
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने राजीव गांधी फाऊंडेशन व चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गृह मंत्रालयाने यासाठी एक इंटर मिनिस्ट्रीयल कमिटीचीही नेमणूक केली असून ही कमिटी समन्वयकाची भूमिका बजावणार आहे. याप्रकरणाचा तपास ईडीतील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात होणार आहे. गांधी कुटुंबीयांशी संलग्न असणाऱ्या या दोन्ही ट्रस्टने नियमांचे उल्लंघन तर केले नाही ना? याचा तपास करण्यात येणार आहे.
भाजपाकडून काही दिवसांपूर्वी राजीव गांधी फाऊंडेशनला चीनी दुतावासाकडून आर्थिक मदत म्हणजे डोनेशन मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार तीन ट्रस्टची चौकशी होणार आहे. राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तीन फाऊंडेशनची ईडीकडून चौकशी होईल. प्रिव्हेन्श ऑफ मनी लाँड्रिग अॅक्ट आणि इन्कम टॅक्सच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप या फाऊंडेशनवर लावण्यात आला आहे.
MHA sets up inter-ministerial committee to coordinate investigations into violation of various legal provisions of PMLA, Income Tax Act, FCRA etc by Rajiv Gandhi Foundation, Rajiv Gandhi Charitable Trust & Indira Gandhi Memorial Trust. Spl. Dir. of ED will head the committee: MHA pic.twitter.com/lOrLTJ3Lah
— ANI (@ANI) July 8, 2020
अंमलबजावणी संचालनालय म्हणजेची ईडीतील एक वरिष्ठ अधिकारी, संचालक या प्रकरणाच्या चौकशीचं नेतृत्व करणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आरोपात, राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून निधी मिळत असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी, काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले होते. तसेच, भारत-चीन सीमावादावरुन लक्ष हटविण्यासाठीच भाजपा असे आरोप करत असल्याचे काँग्रेसने म्हटले होते.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी 21 जून 1991 साली सोनिया गांधी यांनी या फाऊंडेशनची सुरुवात केली होती. हे फाऊंडेशन शिक्षण, विज्ञान आणि टेक्नॉलॉजीचे प्रमोशन, वंचित-शोषित आणि दिव्यांगांच्या प्रगतीसाठी कार्य करते. डोनेशनच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशावरच या संस्थेचे कामकाज चालते. सोनिया गांधी या संस्थेच्या अध्यक्षा असून डॉ. मनमोहनसिंग, राहुल गांधी व प्रियांका गांधी या फाऊंडेशनच्या ट्रस्टी आहेत.