"राजीव गांधी एका मुलाखतीत आरक्षण मिळणाऱ्यांना 'बुद्धू' म्हणाले होते अन्..."; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 09:24 PM2024-09-14T21:24:08+5:302024-09-14T21:25:52+5:30
राजीव गांधी एका मुलाखतीत आरक्षण मिळणाऱ्यांना 'बुद्धू'ही म्हणाले होते. एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचा याहून मोठा आपमान काय असू शकतो? असा सवाल करत आज (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर प्रहार केला.
जेव्हा राजीव गांधी विरोधीपक्षनेते होते, तेव्हाचे संसदेतील त्यांचे भाषण आहे, त्यांनी आरक्षणाला कडाडून विरोध केला होता. ते एका मुलाखतीत आरक्षण मिळणाऱ्यांना 'बुद्धू'ही म्हणाले होते. हे राजीवजी आहेत. एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचा याहून मोठा आपमान काय असू शकतो? असा सवाल करत आज (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. ते हरियाणामधील कुरुक्षेत्रात आयोजित भाजपच्या एका प्रचारसभेत जनतेला संबोधित करत होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातीलकाँग्रेसच्या भावनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी म्हणाले, "भारतात सर्वात मोठा दलित विरोधी, ओबीसी विरोधी, आदिवासी विरोधी, जर कुणी असेल तर, तो काँग्रेसचा परिवार आहे. आता या लोकांनी म्हटले आहे की, सरकारमध्ये आल्यास, दलित आणि मागास समाजाचे आरक्षण रद्द करणार. हेच या परिवाराचे सत्य आहे. काँग्रेसचा परिवार नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करत होता. आरक्षणाला घोर विरोध करत आला आहे. या परिवाराने नेहमीच दलीत, ओबीसी आणि आदिवासी समाजाचा अपमान केला आहे. आपण लक्षात असू द्या, नेहरू जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी आरक्षणाला विरोध केला होता. राज्यांतील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, पुरावे उपलब्ध आहेत. एवढेच नाही, तर नेहरू असेही म्हणाले होते की, आरक्षण असलेल्यांनी नोकरी मिळवली तर, सरकारी सेवांची क्वालिटी खराब होईल. हे नेहरूंचे शब्द आहेत."
ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा इतिहास सांगताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेतले. ते म्हणाले, "ओबीसी आरक्षणासाठी ज्या काकासाहेब कालेलकर आयोगाची स्थापना झाली होती, त्याचा जो अहवाल आला होता, तो ओबीसी समाजाचे भाग्य बदलणारा होता. पण पंडित नेहरूंनी तो थंड बासनात टाकला. नेहरूंनंतर इंदिरा गांधी आल्या, त्यांनीही ओबीसी आरक्षण रोखून ठेवले. जेव्हा देशाने त्यांना शिक्षा केली, जनता पक्षाचे सरकार आले, मोरांजी भाईंच्या नेतृत्वात मंडल आयोगाची स्थापना झाली. मत्र नंतर पुन्हा काँग्रेस आली, त्यांनी मंडल आयोगाचा अहवालही थंड बासनात टाकला होता."
...तेव्हा कुठे ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले-
पुढे बोलताना मोदी म्हणाले, "राजीव गांधींनीही आपल्या सरकारच्या काळात ओबीसींना आरक्षण मिळू दिले नाही. जेव्हा केंद्रात भाजपच्या समर्थनाने व्हीपीसिंहांचे सरकार बनले, तेव्हा मंडल आयोगाचा अहवाल लागू झाला. (व्हीपीसिंहांचे सरकार आले होते, अटलजींच्या जनसंघाने/भाजपने समर्थन केले होते.) तेव्हा कुठे ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले. जेव्हा भाजपचे समर्थन होते." असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
आजची काँग्रेस अर्बन नक्षलवादाचं नवं रूप -
मोदी म्हणाले, "गांधीजी नेहमीच सत्याची बाजू घेत होते. स्वातंत्र्यानंतर काही वर्षे काँग्रेसवर महात्मा गांधींच्या संस्काराचा परिणाम होता. मात्र, आज ही ती जुणी काँग्रेस नाही. आजची काँग्रेस म्हणजे, अर्बन नक्षलवादाचे नवे रूप बनली आहे. आता काँग्रेसला खोटे बोलण्यात कसल्याही प्रकारची लाज वाटत नाही. काँग्रेसचे खोटे पकडले गेले तरी तिला लाज वाटत नाही. काँग्रेस रोजच्या रोज एक नवं खोटं बोलते. काँग्रेस देशाच्या एकात्मतेवर सातत्याने वार करत आहे. काँग्रेसकडून देशावर नक्षलवादी विचार थोपले जात आहेत." एवढेच नाही तर, "भाजपला बदनाम करण्यासाठी, भारताची बदनामी करण्यात त्यांना (काँग्रेस) जराही लाज वाटत नाही. यामुळे आपल्याला काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांपासून सावधान रहायचे आहे," असेही मोदी यावेली म्हणाले.
पुन्हा एकदा भाजप सरकार बनवण्याचे आवाहन -
यावेळी सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सरकारच्या कामांचा पाढा वाचत हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला. हरियाणामध्ये भाजपची हैटट्रिक निश्चित असल्याचेही ते म्हणाले. तसेच, "विकसित भारतासाठी हरियाणा विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे. हरियाणाच्या पावण भूमिवरून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा भाजप सरकार बनवण्यासाठी निवेदन करतो," असेही मोदी म्हणाले.