नवी दिल्ली – टोकियो ऑल्मपिकच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. ऑल्मपिकमध्ये अनेक भारतीय खेळाडू देशाचं नाव उंचावत पदकं पटकावत आहेत. यातच केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारचं नाव बदलण्याचं ठरवलं आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, मला संपूर्ण भारतातील नागरिकांकडून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद ठेवण्याबाबत आग्रह केला जात होता. लोकांच्या या भावनेचा सन्मान राखत खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद पुरस्कारने यापुढे ओळखलं जाईल असं त्यांनी सांगितले.
तसेच ऑल्मपिक खेळांमध्ये भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी आपल्या सर्वांना ज्ञात आहे. विशेषत: हॉकीमध्ये आपल्या पुरुष-महिला खेळाडूंनी जी इच्छाशक्ती दाखवली. विजयासाठी जी जिद्द दाखवली ती वर्तमान काळात आणि येणाऱ्या पिढीसाठी खूप मोठी प्रेरणा देणारी आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
खेलरत्न पुरस्काराचा इतिहास
या पुरस्काराची सुरुवात १९९१-९२ मध्ये झाली होती. तेव्हा या पुरस्काराचं नाव देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर नावावर ठेवलं होतं. क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येत होते. खेळाडूंना सन्मानित करून त्यांची प्रतिष्ठा वाढवणे. समाजात अशा खेळाडूंना प्रतिमा उंचावणे यासाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जात होता. मात्र आता या पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल.