नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 74वी जयंती आहे. यानिमित्त आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भावूक झाल्या. राजीव गांधींची राजकीय कारकीर्द लहान होती, पण त्यांचे कार्य महान असल्याचे सोनिया यांनी म्हटले. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचे काम केले. तर आयआयटी, टेलिकम्युनिकेशन आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून भारताच्या 21 व्या शतकाचा पायाही त्यांनी रचला, असे सोनिया गांधींनी म्हटले.
देशातील राजकीय परिवर्तन करण्यातही राजीव गांधींचे मोठे योगदान असल्याचे सोनिया गांधींनी म्हटले आहे. तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीही राजीव गांधींना श्रद्धांजली वाहिली. राजीवजी यांचे नेतृत्व एक आदर्श उदाहरण आहे. कठीणप्रसंगी त्यांचे नेतृत्व आपल्याला दिशा देण्याचे काम करते, असे डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हटले. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांसह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. दरम्यान, सोमवारी सकाळीच नवी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन काँग्रेस नेत्यांनी समाधीस्थळावर आदरांजली वाहिली होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी टेलिकॉम, आयटी, पंचायत राजसहीत अन्य कित्येक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. 1984 पासून ते 1989 पर्यंत राजीव गांधी यांनी पंतप्रधानपद भूषवले आहे.