नवी दिल्ली - निवृत्त व्हाईस अॅडमिरल विनोद पसरिचा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला दावा फेटाळून लावला आहे. तसेच गांधी कुटुंबाने आएनएस विक्रांतवर अधिकृत दौऱ्यासाठी हजर होती. मात्र, राजीव गांधींसोबत कुठलेही परदेशी नागरिक किंवा त्यांचे नातेवाईक या दौऱ्यावर हजर नव्हते, असे नौदलाचे व्हाईस अॅडमिरल पसरिचा यांनी म्हटले आहे. पसरिचा यांच्या व्हिडीओचा संदर्भ देत मोदीचा दावा खोटा असल्याचं काँग्रसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटले आहे.
राजीव गांधींच्या हाँगकाँग दौऱ्यावेळीचा हा प्रसंग असून पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनीही असाच आयएनएस विराटचा दौरा केला होता. त्यावेळी, त्यांच्यासमवेतही त्यांची मुले आणि नातवंडेही त्यांच्यासमेवत होती, असे पसरिचा यांनी म्हटले आहे. तसेच या दौऱ्यावेळी केवळ सोनिया आणि राजीव गांधींसाठीच हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता. राहुल गांधींनी या हेलिकॉप्टरमधून प्रवास केला नसल्याचंही अॅडमिरल पसरिचा यांनी म्हटले आहे. विनोद पसरिचा यांच्या न्यूज चॅनेलवरील व्हिडीओचा संदर्भ देत खेरा यांनी मोदींचे दिल्लीच्या सभेतील वक्तव्य खोटे असून हेच खरं असल्याचे म्हटले आहे. तसेच, विनोद पसरिचा हे त्यावेळी लक्षद्वीप बेटावरील अॅडमिनिस्ट्रेटर होते, असेही खेरा यांनी आपल्या ट्विटरवर नमूद केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रामलीला मैदानावरुन सभेला संबोधित करताना गांधी परिवारावर हल्लाबोल केला होता. दिल्लीतील सभेत मोदींनी पुन्हा एकदा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचे नाव घेऊन काँग्रेसवर टीका केली. राजीव गांधींनी आयएनएस विराट या युद्धनौकेच्या अनावरणावेळी सासरच्यांचे लाड पुरवले, असा घणाघाती आरोप मोदींनी केला आहे. राजीव गांधीच्या सेवेसाठी नौदलाचा गैरवापर करण्यात आल्याचेही मोदींनी म्हटले.देशाच्या सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आयएनएस विराट युद्धनौका तैनात करण्यात येत होती. मात्र, पिकनिकसाठी जाणाऱ्या गांधी परिवाराच्या स्वागतासाठी ती युद्धनौका देण्यात आली. त्यावेळी, आयएनएस विराट 10 दिवस गांधी परिवार आणि नातेवाईकांना घेऊन पिकनिकसाठी पाठविण्यात आल्याचा गंभीर आरोप मोदींनी केला आहे. राजीव गांधींसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी त्यांच्या सासरवाडीचेही लोक हजर होते. विदेशी नागरिकांना भारताच्या युद्धनौकेवरुन फिरवणे हा देशाच्या सुरक्षेशी खेळणं असंच नाही का? असा प्रश्नही मोदींनी विचारला होता. त्यानंतर काँग्रेसनेही यावरुन पलटवार देण्यास सुरुवात केली आहे.