- नितीन अग्रवालनवी दिल्ली : देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या विराट नौकेचा वापर आपल्या कुटुंबाच्या खासगी सुट्यांसाठी माजी पंतप्रधानांनी केला होता, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राजीव गांधी यांचे नाव घेऊन काँग्रेसला लक्ष्य केले. येथील रामलीला मैदानावर बुधवारी मोदी यांनी प्रचारसभेत म्हटले की, आयएनएस विराटला सागरी सीमांच्या रक्षणासाठी तैनात केले गेले आहे. राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा प्रश्न मोदी यांनी विचारला. ते म्हणाले, ‘काँग्रेसने नेहमीच देशाच्या सुरक्षेशी खेळ केला आहे. २०१४ च्या आधीची परिस्थिती आठवून बघा त्यावेळी लोकांना भीती असायची की कुठे काही होतेय का? परंतु, आता देश बदलला आहे.’घराणेशाहीच्या राजकारणावरून मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसचे नामदार काँग्रेसच्या चौथ्या पिढीला बघत आहेत. परंतु, वंशवादी मानसिकतेला फक्त एका कुटुंबापुरते मर्यादित ठेवले गेले नाही तर या कुटुंबाच्या जवळच्या सगळ््या लोकांनी घराणेशाहीचा झेंडा पुढे नेला आहे.मोदी म्हणाले, दिल्लीत शीला दीक्षित, हरियाणात हुड्डा, भजनलाल, बन्सीलाल आणि लालू यांचे घराणे आहे. पंजाबमध्ये बेअंत सिंग यांचे कुटुंब, राजस्थानात गहलोत आणि पायलट, मध्य प्रदेशात शिंदे, कमलनाथ यांचे कुटुंब आणि दिग्विजय सिंह यांचे कुटुंब वंशवाद बळकट करीत आहे.नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवरही टीका केली. केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध मोठ्या आंदोलनाला निष्फळ ठरवले व नंतर जो विडा उचलला त्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले, असे ते म्हणाले. दिल्लीतील सर्व सातही मतदारसंघांसाठी मोदी यांची ही एकमेव सभा ठेवली गेली होती. १२ मे रोजी या मतदारसंघांत मतदान होणार असून दिल्लीकरांना त्यांनी भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले.
राजीव गांधींनी नौदलाचे जहाज कुटुंबाला फिरण्यासाठी वापरले होते
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 5:30 AM