नवी दिल्ली : इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ साली दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगलींना नरसंहार ठरवून, गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी, यासाठीच्या प्रस्तावात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ हा किताब काढून घेण्यात यावा, असे वाक्य घालण्यात आल्यामुळे दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकार अडचणीत आले असून, आम आदमी पक्षातही फाटाफूट होण्याची चिन्हे आहेत.या ठरावावरील चर्चेत भाग घेताना स्व. राजीव गांधी यांचा भारतरत्न किताब काढून घ्यावा, अशी मागणी करावी, असे आपणास सांगण्यात आले होते. ते आपणास मान्य नव्हते. त्यामुळे चर्चेत भाग न घेता, आपण सभागृहातून निघून गेलो. त्यानंतर आपण आमदारकीचा व आपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, असे आपणास अरविंद केजरीवाल यांच्याकडून कळविण्यात आले, असा आरोप आ. अलका लांबा यांनी टिष्ट्वटरवरून केला. मात्र, अलका लांबा यांना राजीनामा देण्यास कोणीही सांगितलेले नाही, असा दावा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.त्यानंतर आपण स्वत:हून राजीनामा देणार असल्याचे अलका लांबा यांनी स्पष्ट केले. अलका लांबा पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या. दिल्लीतील विधानसभा निवडणुकांआधी त्यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. चांदणी चौक मतदारसंघातून निवडून आलेल्या अलका लांबा या दिल्लीत विद्यार्थी नेत्या म्हणूनही ओळखल्या जात.मात्र, मुद्दा अलका लांबा यांच्या राजीनाम्यापुरता नसून, राजीव गांधी यांना दिलेला भारतरत्न हा किताब मागे घेण्याची मागणीही वादात सापडली आहे. तो किताब मागे घेण्याच्या मुद्यासह प्रस्ताव मागे झाला असल्याचे आपचे काही आमदार जाहीरपणे सांगत आहेत. मात्र, संमत झालेल्या प्रस्तावात राजीव गांधी वा भारतरत्न हा उल्लेख नाही, असे विधानसभाध्यक्षांनी नंतर म्हटले आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनीही तोच दावा केला.आ. सोमनाथ भारती यांनी राजीव गांधी यांचा किताब मागे घेण्याच्या मागणीची ओळ मूळ प्रस्तावाला जोडली होती. ती मंजूर झालेली नाही, असे ते म्हणाले. मात्र टंकलिखित प्रस्तावातच तो उल्लेख आहे, असे सांगण्यात आले.या प्रस्तावाला भाजपानेही पाठिंबा दिला होता. मूळ प्रस्तावात बदल केल्याबद्दल सोमनाथ भारती यांच्यावर कारवाई होणार असल्याचे आपचे काही नेते खासगीत सांगत आहेत; पण भारती वा लांबा यांच्यावर कारवाई होण्याची शक्यतानाही.तणाव वाढलाया वादामुळे आम आदमी पक्ष व काँग्रेस यांच्यातील वाद मात्र पुन्हा उफाळला आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या सर्व विरोधकांच्या बैठकीला अरविंद केजरीवाल उपस्थित होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली होती.केजरीवाल यांच्या उपस्थितीमुळे आप व काँग्रेस एका व्यासपीठावर दिसणार, अशी चर्चा सुरू झाली होती; पण आपमधील वरील वादानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, अजय माकन या नेत्यांनी आप व केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र चालवले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव वाढला आहे.
स्व. राजीव गांधी यांच्या ‘भारतरत्न’वरून आपमध्ये वादावादी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 5:37 AM