ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २४ - वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरन हिला एका दिवसासाठी पॅरोल मंजूर झाला असून ती कारागृहाबाहेर आली आहे. नलिनीचे वडील निवृत्त पोलिस अधिकारी होते, त्यांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर तुरूंग प्रशासनाने तिला एक दिवसाचा पॅरोल मंजूर केला.
तामिळनाडूतील वेल्लोर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारी नलिनी वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बुधवारी सकाळी कारागृहातून चेन्नईकडे रवाना झाली. तिच्यासोबत दहा पोलिसा कर्मचारी असून तिच्या घराच्या आसपास कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत न्यायालयाने नलिनी, तिचा पती मुरूगनसह तिघांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. मात्र काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची फाशी रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.