नवी दिल्ली : मोदी सरकारच्या तिसऱ्या अर्थसंकल्पात अर्थकारणासोबतच एक राजकीय संदेशही दडला आहे. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या चार योजनांचे नामांतर करून त्यातील त्यांचे नाव हटविण्यात आले आहे.विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीने राजीव गांधी यांच्या जागी आपल्या पसंतीच्या इतर कुठल्याही व्यक्तीचे नाव या योजनांना दिलेले नाही. राजकीयदृष्ट्या त्या निष्पक्ष वाटाव्यात अशी काळजी हा बदल करताना घेतली गेली. पंचायत राज मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी पंचायत सबलीकरण अभियानाचे नाव येत्या १ एप्रिलपासून पंचायत सबलीकरण अभियान असे ठेवण्याचा निर्णय झाला आहे. ही योजना काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली होती. राजीव गांधी हे पंचायत सुधारणांचे मुख्य शिल्पकार होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.यापूर्वीसुद्धा रालोआ सरकारने राजीव गांधी यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या योजनांचे नाव बदलले होते. राजीव कर्ज योजनेचे नामांतर पंतप्रधान घरकुल योजना असे करण्यात आले होते, तर राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेला दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राजीव गांधींचे नाव योजनांतून हटविले
By admin | Published: March 06, 2016 3:23 AM