नवी दिल्ली-भाजपाचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी पक्षालाच घरचा आहेर देत मोठं विधान केलं आहे. रुडी यांनी त्यांच्या मनातली खदखद अखेर बोलून दाखवली आहे. पक्षातून आपल्याला बाजूला सारलं गेल्याचा आरोप रुडी यांनी केला आहे. बिहारच्या दरभंगा येथे आयोजित 'दृष्टी बिहार अजेंडा २०२५' या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं आहे. नुकत्याच झालेल्या भाजपाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत व्यासपीठावर राजीव प्रताप रुडी यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे ते नाराज झाले होते.
राजीव प्रताप यांची हिच नाराजी त्यांच्या भाषणातून दिसून आली. २८ आणि २९ जानेवारी रोजी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीचा संदर्भ देत राजीव प्रताप रुडी यांनी त्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलो होतो पण उपस्थित नेत्यांनी व्यासपीठावर स्थान दिलं नाही. प्रेक्षक गॅलरीत बसून ते सर्व नेत्यांची भाषणं ऐकत राहिले. सर्व नेत्यांनी भाषण केल्यावर ते घरी परतले.
मला मंचावर स्थान देखील मिळालं नाही...राजीव प्रताप रुडी म्हणाले, "लोक त्यावेळी व्यासपीठावरुन भाषणं देत होते आणि मी तुमच्यासारखा खाली बसलो होतो. मला त्याची काही अडचण नाही आणि अडचण वाटेल तरी कशी कारण माझं आणि तुमचं महत्व आता पक्षात राहिलेलं नाही. कुणी आता तुम्हाला कशाला बोलवेल? प्रगतीची शिडी चढू लागलात की कुणीतरी शिडी मोडून तुम्हाला खाली फेकून देईल. पण तुम्ही आहे तसेच राहा. तुमचं काम तेच आहे"
मोदींचा खरा सैनिक मीच"आज प्रत्येकजण हेच बोलेल की रुडी हे खरंतर नरेंद्र मोदींचे खरे सैनिक आहेत. मोदी सरकारमध्ये आपण मंत्री होतो. वाजपेयींच्या सरकारमध्येही मंत्री होतो. लोक म्हणतील की रुडी भाजपच्या अजेंड्यातून बाहेर फेकले गेले आहेत, म्हणून मला इथे सांगायचे आहे की, या व्यासपीठावर २८ आणि २९ जानेवारी रोजी भाजपच्या कार्यकारिणीची बैठक झाली. मला मात्र स्थान मिळालं नाही", अशी खदखद रुडी यांनी व्यक्त केली.