गुजरात निवडणुकीच्या आधी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गांधीधाम आणि जुनागढमध्ये जाहीर सभांना संबोधित केले. या दौऱ्यात अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गरबा कार्यक्रमासही हजेरी लावली होती. पण याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. कार्यक्रमस्थळी असलेल्या गर्दीमधून कोणीतरी केजरीवाल यांच्यावर पाण्याची बाटली फेकली आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजकोट येथील खोडलधाम गरबा कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उपस्थिती लावली होती. याचवेळी गरबा कार्यक्रमासाठी आलेल्यांपैकी कोणीतरी केजरीवालांवर पाण्याची बाटली फेकली. ही बाटली नेमकी कोणी फेकली हे समजू शकले नाही, त्याच शोध सुरू आहे.
सुदैवाने पाण्याची बाटली डोक्यावरून निघून गेली...
केजरीवाल गरबास्थळी दाखल झाल्यानंतर उपस्थितांचे अभिवादन स्वीकारत असताना हा धक्कादायक प्रकार घडला. पण सुदैवाने पाण्याची बाटली त्यांच्या डोक्यावरून निघून गेल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचं उपस्थित असलेल्या लोकांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा (यांनी भाजपावर गंभीर आरोप केला होता. पंजाबमध्येभाजपाने ऑपरेशन लोटस चालवले असून भाजपा आमच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरपाल सिंग चीमा म्हणाले होते.
“सीरियल किलर भाजपाने आता पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस आणले”
अर्थमंत्री चीमा यांनी भाजपा प्रत्येक AAP आमदाराला प्रत्येकी 25-25 कोटी रुपयांची ऑफर देत आहे असं म्हटलं होतं. आप पंजाबने याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं होतं. "सीरियल किलर भाजपाने आता पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस आणले आहे. पंजाबमधील 'आप'च्या आमदारांना 25-25 कोटींची ऑफर दिली आहे. पण भाजपा हे विसरत आहे की आम आदमी पक्षाचा एकही आमदार विक्रीसाठी नाही. दिल्लीप्रमाणे पंजाबमध्येही भाजपाची कारवाई अपयशी ठरेल" असं ट्विटमध्ये म्हटलं होतं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"