Rajkot Game zone Fire Accident: काल शनिवारी २५ मे रोजी गुजरातमधील राजकोट येथे टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागली. या अपघातात ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गेम झोनच्या मालकासह ६ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. गेम झोनच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, अपघाताबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेम झोनचे मालक लोकांना प्रवेशासाठी 'डेथ फॉर्म' भरायला लावायचे. याबाबत आता पोलीस तपास करत आहेत.
टीआरपी गेम झोनमध्ये प्रवेश करण्यासाठी एक फॉर्म भरण्यात आला होता, यामध्ये स्पष्टपणे लिहिले होते की, कोणत्याही कारणास्तव कोणी जखमी झाले किंवा मरण पावले तर व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही. गेम खेळताना दुखापत झाल्यास, गेम झोन त्याची जबाबदारी घेणार नाही. गेम झोनचे कर्मचारी हे फॉर्म भरणाऱ्यांनाच प्रवेश देत होते.
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एसआयटी पथक अपघाताची चौकशी करणार आहेत. दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांनी राजकोटमधील एम्स आणि इतर रुग्णालयांना भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली.
या अपघाताबाबत पोलिसांनी गेम झोनचे मालक युवराज सिंग सोलंकी आणि प्रकाश जैन यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४, ३०८, ३३७, ३३८ आणि ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी युवराजसिंग सोलंकी याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. गेमझोनचे चार मालक असून त्यापैकी युवराज सिंग सोलंकी, प्रकाश जैन, राहुल राठोड, महेंद्रसिंग सोलंकी यांची नावे समोर आली आहेत.
शनिवारी सायंकाळी गेम झोनमध्ये भीषण आग लागली. या अपघातात ३५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १२ लहान मुलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत गेम झोनमधून लोकांची सुटका करण्यात येत होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. तसेच गेम झोनमध्ये २००० लीटर डिझेल आणि १५०० लीटर पेट्रोल ठेवण्यात आले होते.
गेम झोनच्या मालकांनी अग्निशमन विभागाकडून फायर एनओसी घेतली नसल्याचा दावा केला जात आहे. तसेच, गेम झोनमधून बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन दरवाजा नव्हता. इनडोअर गेम झोनमध्ये प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी एकच गेट होते.