गुजरातमध्ये एका व्यावसायिकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 40 वर्षीय व्यावसायिक एका ठिकाणी उभे असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि ते खाली कोसळले. यानंतर लोकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय इलियास देवला हे राजकोट जिल्ह्यातील उपलेटाचे रहिवासी होते. इलियास हे कपड्यांचा व्यवसाय करायचे. त्यांचे उपलेटामध्ये जिलानी चॉईस नावाने रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. दुकानासाठीच सामान घेण्यासाठी ते अहमदाबादला गेले होते. ते बाजारात दुसऱ्या व्यक्तीसोबत उभे असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं.
इलियास यांनी याच दरम्यान जवळच्या व्यक्तीच्या खांद्याचा आधार घेतला, ते स्वत:चा तोल सांभाळू शकले नाहीत आणि ते खाली पडले. इलियास यांना तातडीने उपचासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्हीही फुटेज समोर आलं आहे.
सध्या हार्ट अटॅकचा धोका वाढलेला आहे. हार्ट अटॅकच्या लक्षणांमध्ये छाती, मान, पाठ किंवा हातामध्ये जडपणा किंवा वेदना तसेच थकवा, चक्कर येणे, हृदयाचे असामान्य ठोके यांचा समावेश होतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये असामान्य लक्षणे दिसण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आरोग्याची नीट काळजी घ्या.