दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेले राजकुमार आनंद यांनी नुकताच आपल्या मंत्रिपदाचा आणि आम आदमी पार्टीचा राजीनामा दिला होता. त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून राजीनामा दिल्याची माहिती दिली होती. या पत्रात राजकुमार आनंद यांनी केजरीवाल सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
आम आदमी पार्टीचा जन्म भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून झाला, मात्र आज हा पक्षच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे, असं आनंद यांनी पत्रात म्हटलं आहे. "आमचे दोन मंत्री तुरुंगात आहेत, आमचे मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. आमच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. सरकारमध्ये राहण्यासाठी आपल्याकडे नैतिक ताकद उरली आहे, असं मला वाटत नाही" असंही सांगितलं.
ते म्हणाले की, सर्वात मोठा विश्वासघात आमच्या कार्यकर्त्यांशी झाला आहे आणि दिल्लीतील जनतेने आम आदमी पार्टीला मोठ्या आशेने सत्तेत आणले जेणेकरून दिल्लीतून भ्रष्टाचार संपुष्टात येईल. मात्र सत्तेत आल्यानंतर या पक्षालाही भ्रष्टाचारापासून वाचवता आले नाही.
"मला माझं नाव भ्रष्टाचाराशी जोडायचं नाही"
राजकुमार आनंद म्हणाले की, पक्षाचे मोठे नेते भ्रष्टाचारात गुंततात आणि कार्यकर्ते उन्हात बसतात. या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करणं मला सहन होत नव्हतं. मला यापुढे माझं नाव या सरकारशी आणि भ्रष्टाचाराशी जोडायचं नाही.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेव्हा ईडीने सीएम केजरीवाल यांना दारू घोटाळ्यात चौकशीसाठी बोलावले होते, त्याआधी ईडीने मंत्री राजकुमार आनंद यांच्या निवासस्थानावर छापा टाकला होता. ईडीच्या पथकाने सिव्हिल लाईन्समधील मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासह 9 ठिकाणांची तपासणी केली होती.
कोण आहेत राजकुमार आनंद?
राजकुमार आनंद 2020 मध्ये पहिल्यांदा पटेल नगर मतदारसंघातून आमदार झाले. याआधी त्यांच्या पत्नी वीणा आनंद याही याच विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या. दिल्ली सरकारचे माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या जागी राजकुमार आनंद यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.