प्रत्येक निवडणुकीत फटका, आता गड भेदण्याचे आव्हान; अंतर्गत गटबाजीचे ग्रहण काॅंग्रेसचा पिच्छा साेडेना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 10:28 AM2024-04-27T10:28:35+5:302024-04-27T10:29:44+5:30
भूपेश बघेल यांच्या नावाला राजनांदगाव लोकसभा मतदार संघातील स्थानिक काँग्रेस नेत्यांचाच विरोध असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली होती.
गजानन चोपडे
रायपूर: ‘पेड के कटने का किस्सा नही होता, अगर कुल्हाडी मे लकडी का हिस्सा नही होता’, ही म्हण छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर तंतोतंत खरी ठरते. अंतर्गत राजकारणाचा फटका या पक्षाला प्रत्येक निवडणुकीत बसला आहे. त्यामुळे गटबाजीचे ग्रहण काँग्रेसचा पिच्छा सोडतच नाही, असे चित्र छत्तीसगडमध्ये दिसत आहे.
भूपेश बघेल यांच्या नावाला राजनांदगाव लोकसभा मतदार संघातील स्थानिक काँग्रेस नेत्यांचाच विरोध असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली होती. आता तिसऱ्या टप्प्यात छत्तीसगडमधील ज्या सात जागांचा यात समावेश आहे त्यात कोरबा वगळता सहा जागांवर भाजपचा कब्जा आहे. राज्याची राजधानी असल्याने रायपूर मतदारसंघावर सर्वांचे लक्ष असते. यंदा भाजपने भाजपचे ज्येष्ठ नेते ब्रजमोहन अग्रवाल यांना मैदानात उतरविले आहे. त्यांचा सामना काँग्रेसचे युवा नेते विकास उपाध्याय यांच्याशी होत आहे. १९९६ पासून हा गड भाजपने राखला आहे. तो भेदण्याचे आव्हान यंदा काँग्रेसपुढे आहे.
पुन्हा नवा उमेदवार
बिलासपूर मतदारसंघात दोन्ही निवडणुकीत भाजपने उमेदवार बदलला. यंदाही नवीन उमेदवारच देण्यात आला आहे. येथे भाजपने तोखनराम साहू तर काँग्रेसने देवेंद्र यादव यांना मैदानात उतरविले आहे. दुर्गमधून भाजपचे विद्यमान खासदार विजय बघेल पुन्हा मैदानात आहेत.
कोरबा मतदारसंघ अपवाद
छत्तीसगडच्या कोरबा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या ज्योत्सना चरणदास महंत यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. यंदा भाजपने सरोज पांडेय यांना मैदानात उतरविले असून काँग्रेसकडून ही जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी वेगळी रणनिती आखली आहे.
मोदी लाट असतानाही २०१९ मध्ये काँग्रेसच्या ज्योत्सना चरणदास महंत कोरबा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यामुळे पक्षाने यंदा त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आहे. तिकडे सरोज पांडेय या स्थानिक उमेदवार नसल्याचा मुद्दा काँग्रेस कॅश करण्याचा प्रयत्न करीत आहेत.