ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रोटोकॉल तोडत एका जवानाची गळाभेट घेतली. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झालेल्या गोळीबारात जखमी झाल्याने अपंगत्व आलेल्या या जवानाची गळाभेट घेत राजनाथ सिंह यांनी त्याच्या साहसाचं कौतुक केलं. गोधराज मीना असं या जवानांचं नाव असून गुरुवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी शौर्य पदक देऊन त्याचा सन्मान केला.
2014 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक गोळ्या लागल्याने गोधराज गंभीर जखमी झाले होते. शौर्य पदक दिल्यानंतर आपलं 85 टक्के शरिर हालचाल करत नसतानाही त्यांनी सलामी देण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रभावित झालेल्या राजनाथ सिंह यांनी प्रोटोकॉल तोडत पुढे जाऊन त्यांची गळाभेट घेतली. प्रोटोकॉलनुसार पदक मिळाल्यानंतर सन्मान करणा-या व्यक्तीसोबत हस्तांदोलन करत सलामी द्यायची असते.
राजनाथ सिंह यांनी यावेळी गोधराज मीना यांची शौर्यगाथा सांगितली. 5 ऑगस्ट 2014 रोजी उधमपूरमधील नरसू नालाजवळ बीएसएफ जवानांना घेऊन जाणा-या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. बसच्या सुरक्षेची संपुर्ण जबाबदारी गोधराज मीना यांच्या खांद्यावर होती. गोधराज मीना यांनी साहसीपणे आणि विचारपूर्वक दहशतवाद्यांशी लढा दिला आणि त्यांना बसमध्ये घुसण्यापासून रोखले. त्यांच्या या शौर्यामुळे 30 जवांनाचा जीव वाचला. मात्र दहशतवाद्यांशी दोन हात करत असताना गोळ्या लागून त्यांचं शरिर जखमी झालं होतं. यामुळेच त्यांच्या शरिराचा 85 टक्के भाग निकामी झाला. आतातर त्यांना बोलणंही शक्य होत नाही.
राजनाथ सिंह यांच्या तोंडून गोधराज मीना यांची ही शौर्यगाथा ऐकताना संपुर्ण सभागृह स्तव्ध झालं होतं. टाळ्यांचा कडकडाट करत त्यांनी गोधराज मीना यांचं कौतुक केलं. कार्यक्रमात उपस्थित एका अधिका-याने हा एक न विसरता येण्यासारखा क्षण असल्याचं सांगितलं. गोधराज मीना यांना चालता, बोलताना त्रास होत असतानाही पदक घेण्यासाठी ते संपुर्ण गणवेशात आले होते.