राहुल गांधींपेक्षा शेतीची जास्त माहिती : राजनाथ सिंहांचे टीकेला थेट प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 11:25 AM2020-12-30T11:25:14+5:302020-12-30T11:30:15+5:30
शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, आम्ही शेतकऱ्यांविरोधी निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली :राहुल गांधी माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत. त्यांच्यापेक्षा मला शेतीबद्दल जास्त माहिती आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीलता दाखवण्याचे कारण नाही. शेतकरी आंदोलनामुळे केवळ मी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील दुःखी आहेत, असे त्यांनी नमूद केले. नवीन शेतकरी कायद्यासंदर्भात देशातील काही घटक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला आहे. केवळ हो किंवा नाही, अशा पद्धतीने चर्चा होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी विस्तृत आणि सविस्तर चर्चा केली पाहिजे, अशी मी विनंती करतो. लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी आणि नक्षलवादी असल्याचा तथाकथित आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. यावर जोरदार पलटवार करत राजनाथ सिंह म्हणाले की, अशा प्रकारचा आरोप करणे चुकीचे आहे. आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करतो. ते अन्नदाते आहेत. मी एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतला आहे. शेतीसंदर्भात राहुल गांधींपेक्षा मला जास्त माहिती आहे. आम्ही शेतकऱ्यांविरोधी निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर अन्य देशातील पंतप्रधानांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही. भारताच्या अंतर्गत मुद्द्यांपासून त्यांनी दूर राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानास्पद टीका करणे योग्य नाही. ते देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीवर खालच्या पातळीवर टीका करणे अशोभनीय असून, ही खेदजनक बाब आहे, असे राजनाथ सिंह यांनी यावेळी नमूद केले.