Rajnath Singh: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समान नागरी संहिता कायद्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीशो बोलताना त्यांनी 'संपूर्ण देशात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे,' असे वक्तव्य केले. यासह त्यांनी विविध विषयांवरही आपली प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले संरक्षण मंत्री ?यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, 'आता भारतात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे. सर्व राज्यांनी याचा विचार करावा. ज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी केली असेल किंवा करणार असतील, अशा राज्यांचे मी अभिनंदन करतो.' यावेळी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राजनाथ सिंह म्हणाले की, 'हा अत्यंत घृणास्पद गुन्हा आहे. दोषीला कठोर शिक्षा झाली पाहिजे.'
गुजरातबाबत काय म्हणाले?गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत ते म्हणाले की, '2024कडे वाटचाल करत आहोत. फक्त गुजरातमध्येच नव्हे तर केंद्रातही मोदी सरकार पुन्हा येणार आहे. आम्ही आमच्या कामगिरीच्या आधारावर गुजरात जिंकतोय. पंतप्रधानांचे देशभरातील दौरे पहा, ते खूप मेहनत करतात. याचा परिणाम म्हणजे भारताची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे.'
खर्गेंच्या वक्तव्यावर नाराजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावर संरक्षण मंत्री म्हणाले की, 'मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांवरील वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. राजकारणात प्रतिष्ठा असली पाहिजे, खर्गे साहेब काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांना अशी वक्तव्ये शोभत नाही. पंतप्रधान ही व्यक्ती नसून संस्था आहे, अशी विधाने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना शोभत नाहीत. काँग्रेस हताश आणि हतबल झाल्याचे दिसत आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.