दीनानाथ परब, ऑनलाइन लोकमत
रण मैदानावर युध्दाचा शंखनाद झाला. समोर शत्रू म्हणून उभे ठाकले होते कट्टर हाडवैरी पाकिस्तानी सैन्य. अमेरिकन बनावटीचे पॅटन रणगाडे, एफ-१६ लढाऊ विमाने (अमेरिकेची), एके-४७ रायफल, हॅण्ड ग्रेनेड, दारुगोळा अशा पूर्ण तयारीनिशी पाकिस्तानी सैन्य सज्ज होते. पाकिस्तानी सैन्याचे सेनापती होते मेजर जनरल राहील शरीफ. सोबतीला पंतप्रधान नवाझ शरीफही आले होते. पण ते पाकिस्तानी लोकशाहीच्या नियमाप्रमाणे सैन्याच्या मागे उभे होते. म्हणजे पराभवाची चिन्हे दिसू लागताच मागच्या मागे सटकायला मोकळे.
रणभूमीवर जमलेल्या आपल्या जवानांमध्ये जोश भरण्यासाठी राहील शरीफ यांनी गर्जना केली. जवानो आगे आओ| आज हमे काश्मीर पर फत्तेह हासिल करने का मौका मिला है|इससे पेहले चार जंगो में जो हम हासिल नही कर सके उसे पाने का हमें परवरदिगार ने मौका दिया हैं|(कदाचित ते बॉर्डर सिनेमा पाहून आले असावेत)
राहील शरीफ यांचा आवाज बंद होताच आकाशात ढगांच्या जोरदार गडगडाटासह वीज तळपली. पाकिस्तानी सैन्याचे डोळे आकाशाकडे गेले. आकाशातून बॉम्ब वर्षाव होतोय असे वाटल्याने काही क्षणांसाठी त्यांची पळापळ झाली.
इतक्यात आकाशवाणी सुरु झाली. नही छोडेंगे, नही छोडेंगे, किसी भी किंमत पर हम पाकिस्तान को नही छोडेंगे |आतंकवाद को हम अपनी भूमी पर पनपने नही देंगे| गोली का जबाब, गोली से देंगे|पाकिस्तान को मुंहतोड जबाब देंगे| तो आवाज बंद होताच, भारताच्या रणक्षेत्रात प्रकाशाचा मोठा झोत तयार झाला. त्या दिव्यप्रकाशामुळे दोन्ही शरीफांसह समस्त पाकिस्तानी सैन्याला काही वेळांसाठी डोळे बंद करावे लागले. तो प्रकाशाचा झोत हळूहळू निघून जाताच समोरचे दुश्य बघून दोन्ही शरीफ बुचकळयात पडले. भारताच्या रणक्षेत्रात फक्त घोडयांचा एक रथ होता. त्या रथावर धुनर्धर होते राजनाथ सिंह तर, सारथ्य करत होते नरेंद्र मोदी.
राहील शरीफ यांनी ही सुवर्णसंधी साधून घेण्यासाठी पाकिस्तानी सैन्याला आक्रमणाचा आदेश देताच अस्त्रे सुटली. राजनाथ यांनीही आपला बाण धनुष्याला लावून डोळे मिटून आकाशाकडे पाहून मंत्र पुटपुटला आणि बाण सोडला. राजनाथ यांच्या सिद्धी प्राप्त बाणाने हवेतच पाकिस्तानची सर्व अस्त्रे नष्ट केली. पुन्हा तसाच आक्रमणाचा आदेश निघाला.
तितक्यात माझ्या कानावर पडलेल्या 'काव', 'काव' आवाजाने मला जाग आली. मी डोळे चोळत बिछान्यातू उठलो, घरातल्या खिडकीवर कावळयाची काव काव सुरु होती. घडयाळाकडे बघितले, सकाळचे नऊ वाजले होते. शेजारी पेपर पडला होता. राजनाथ सिंहाच्या फोटोसह हेडींग होती.
"हम पाकिस्तान को मुंहतोड जबाब देंगे" - राजनाथ सिंह
(ही वात्रटिका असून कृपया खरी बातमी समजू नये)