नवी दिल्ली: रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना बुधवारी भेटलेल्या सूफी मुस्लिम धर्मगुरुंच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्ग्याचे प्रमुख म्हणून कोणी तोतयाने केले असावे अशी शंका निर्माण झाली आहे.अजमेर दर्ग्याचे प्रमुख सैयद झैनुल अबेदिन यांच्या नेतृत्वाखाली १२ सूफी धर्मगुरुंचे शिष्टमंडळ राजनाथ सिंग यांना त्यांच्या अकबर रोडवरील निवासस्थानी भेटले, असे गृहमंत्र्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.मात्र अजमेर दर्ग्याचे प्रमुख राजनाथ सिंग यांना भेटल्याचा सैयद झैनुल यांचे चिरंजीव सैयद नसीरुद्दीन अबेदिन यांनी इन्कार केला. सैयद नसरुद्दीन म्हणाले, अजमेर दर्ग्यात सुमारे ४,००० खादिम (सेवादार) आहेत. आपण अजमेर दर्ग्याचे प्रमुख असल्याचा बहाणा करून एक व्यक्ती श्री श्री रविशंकर यांच्यासोबत फिरत असते. हा ‘तोतया’ माझ्या वडिलांसारखा पोषाखही करतो.‘आर्ट आॅफ लीव्हिंग’चे प्रमुख श्री श्री रविशंकर हे शिष्टमंडळ घेऊन राजनाथ सिंग यांच्याकडे जातील, असे आधी ठरले होते. परंतु ऐनवेळी लखनऊ येथे जावे लागल्याने ते आले नाहीत. आपण याच आठवड्यात अयोध्येला जाऊन सर्व संबंधितांशी चर्चा करू, असे रविशंकर यांनी सोमवारी सांगितले होते.अयोध्येचा वाद सर्वसंमतीने सुटावा यासाठी रविशंकर करत असलेल्या प्रयत्नांपासून भाजपा चार हात दूर आहे. राम जन्मभूमी न्यासचे माजी प्रमुख व भाजपाचे माजी खासदार राम विलास वेदान्ती यांनीही रामजन्मभूमी आंदोलनाशी रविशंकर आधीपासून संबंधित नसल्याने आता मध्यस्थी करण्यास ते मुळीच पात्र नाहीत, असे म्हटले आहे. वादातील दुसरा पक्ष असलेल्या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने हा वाद न्यायालयातच सुटू शकेल, अशी भूमिका घेतली आहे.
राजनाथसिंग यांना भेटलेला अजमेर दर्ग्याचा प्रमुख तोतया? अबेदिन यांच्या मुलाने केला भेटीचा इन्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 10:25 PM