Rajnath Singh Net Worth : नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राजनाथ सिंह यांनी लखनऊमधून उमेदवारी अर्ज भरला. भाजपाने त्यांना सलग तिसऱ्यांदा या जागेवरून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार, राजनाथ सिंह यांच्याकडे ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह यांच्याकडे ७५,००० रुपये, तर त्यांच्या पत्नीकडे ४५,००० रुपये रोख आहेत. बँक ठेवींबद्दल बोलायचे तर राजनाथ सिंह यांच्या लखनौ आणि दिल्लीतील वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ३,११,३२,९६२ रुपये जमा आहेत. तसेच, त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात ९०,७१,०७४ रुपये जमा आहेत.
राजनाथ सिंह यांनी कोणत्याही शेअर्स किंवा बाँडमध्ये पैसे गुंतवलेले नाहीत किंवा त्यांनी कोणत्याही बचत योजनेत गुंतवणूक केलेली नाही. मात्र, त्यांच्या पत्नीने पोस्ट ऑफिस खात्यात ६.५१ लाख रुपये गुंतवले आहेत. राजनाथ सिंह यांच्याकडे ६० ग्रॅम सोने आहे, ज्याची किंमत ४.२० लाख रुपये आहे. तसेच, त्यांच्याकडे ४ लाख रुपयांची अनेक मौल्यवान वस्तू आहेत. याशिवाय त्यांच्या पत्नीकडे ७५० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्याची किंमत ५२,५०,००० रुपये आहे. त्यांच्याकडे १२.५ किलो चांदी आहे, ज्याची किंमत ९,३७,५०० रुपये आहे.
याचबरोबर, राजनाथ सिंह यांच्या संपत्तीत शस्त्रांचाही समावेश आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ३२ बोरची रिव्हॉल्व्हर असून तिची किंमत दहा हजार रुपये आहे. तसेच, एक बंदूकही त्यांच्याकडे आहे. या बंदुकीची किंमत १०,००० रुपये आहे. स्थावर मालमत्तेबाबत बोलायचे झाले तर राजनाथ सिंह यांच्या नावावर १.४७ कोटी रुपयांची शेतजमीन आहे, तर लखनऊमध्ये त्यांच्या नावावर एक घर आहे, ज्याची किंमत १.८७ लाखांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे कोट्यवधींची संपत्ती असूनही राजनाथ सिंह यांच्या नावावर एकही कार नाही.