India Defense Manufacturing : मागील काही वर्षांपासून भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. या वाढीमुळे भारताची निर्यात क्षमतादेखील वाढली आहे. यात डिफेन्स क्षेत्राचाही मोठा वाटा आहे. स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली आहे. राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी (5 जुलै) सांगितले की, भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात 2023-24 या आर्थिक वर्षात 16.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे संरक्षण उत्पादनाचे एकूण मूल्य 1.26 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये म्हटले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मेक इन इंडिया सातत्याने नवनवीन विक्रम करत आहे. भारताने 2023-24 मध्ये संरक्षण उत्पादनाच्या मूल्यात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. 2023-24 मध्ये संरक्षण उत्पादनांचे मूल्य 1,26,887 कोटी रुपयांवर पोहोचले असून, हा आकडा मागील आर्थिक वर्षातील उत्पादन मूल्याच्या तुलनेत 16.8 टक्के अधिक आहे."
या यशाबद्दल राजनाथ सिंह यांनी सार्वजनिक क्षेत्रातील (पीएसयू) आणि खाजगी क्षेत्राचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "डीपीएसयू, इतर संरक्षण पीएसयू आणि खाजगी क्षेत्रासह आमच्या संरक्षण उद्योगाचे अभिनंदन. भारताला एक आघाडीचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे," अशी पोस्ट त्यांनी केली.
पीएम मोदींनी केले अभिनंदनराजनाथ सिंह यांची पोस्ट रिशेअर करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, "हा अतिशय उत्साहवर्धक विकास आहे. या कार्यक्रमात योगदान दिलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो. क्षमता आणखी वाढवण्यासाठी आणि भारताला एक आघाडीचे जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून पुढे आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. यामुळे देशाची सुरक्षा यंत्रणा तर वाढेलच, पण आपल्याला आत्मनिर्भर बनवेल."
भारताची संरक्षण निर्यात वाढलीकेंद्र सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षात 35,000 कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीसह 1,75,000 कोटी रुपयांचे स्वदेशी संरक्षण उत्पादन साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर, सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षात 21 हजार कोटी रुपयांची संरक्षण निर्यात केली होती, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 32.5 टक्क्यांनी अधिक आहे.