संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांसाठी भाजपा ही वॉशिंग मशीन आहे, या विरोधकांच्या आरोपाला आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यात जाताच डाग धुतले जातात. केंद्रीय तपास यंत्रणा आपलं काम करते. आम्ही कोणावर दबाव आणत नाही असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, "कोणतीच वॉशिंग मशीन नाही. तपास यंत्रणा आपलं काम करत आहे. आम्ही एजन्सीला कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यास सांगत नाही. ते (विरोधक) आपल्या चुका लपवण्यासाठी असे आरोप करतात. असं करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे."
विरोधकांवर निशाणा साधत त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालय दिलासा का देत नाही, असा सवाल केला आहे. तसेच "केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे. हे एकदा मान्य केलं तर न्यायालयावरही आमचं नियंत्रण आहे का? या लोकांना काय म्हणायचे आहे?"
"ईडी आणि सीबीआय त्यांचं काम नीट करत आहेत. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना कोर्टातूनच दिलासा मिळाला आहे. भारत भ्रष्टाचारमुक्त करायचा आहे. ही आमच्या सरकारची बांधिलकी आहे. याबाबत सातत्याने काम सुरू आहे" असं देखील राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.