Rajnath Singh on Pakistan: मोदी सरकारची दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. गेल्या दहा वर्षात सरकारने शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. अशातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवाद आणि पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानला इतकी मिरची लागली की, पाकने संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
एका मुलाखतीत राजनाथ सिंह यांना विचारण्यात आले होते की, ब्रिटिश वृत्तपत्र 'द गार्डियन'च्या वृत्तात भारतीय गुप्तचर संस्थांनी 2019 नंतर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला होता. तसेच, भारताने आपले ध्येय साध्य करण्यासाठी पाकिस्तानच्या स्थानिक गुन्हेगारांची मदत घेतल्याचेही म्हटले. यावर तुम्ही काय सांगाल? या प्रश्नाला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार मारल्याचे म्हटले.
भारताला जबाबदार धरावे: पाकिस्तानसंरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याने नाराज झालेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करुन भारतावर अनेक आरोप केले. निवेदनात म्हटले की, भारतीय संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या वक्तव्याचा पाकिस्तान निषेध करतो. पाक सरकारने पाकिस्तानमध्ये होत असलेल्या हत्यांसाठी भारताला जबाबदार धरले आणि त्याचे पुरावेही दिले. पाकिस्तानात घुसून लोकांना म्हटले जाते आणि ठार केले जाते, हा भारताच्या अपराधाचा पुरावा आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला या कृतींसाठी जबाबदार धरावे, असे पाकिस्तानच्या निवेदनात म्हटले आहे.
काय म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह?पाकिस्तानमध्ये होत असलेल्या हत्याकांडावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण मंत्री म्हणाले होते की, आपल्या शेजारी देशातील कोणत्याही दहशतवाद्याने आपल्या भारताची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला किंवा भारतात दहशतवादी कारवाया केल्या, तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. तो पाकिस्तानात पळून गेला, तरीदेखील आम्ही पाकिस्तानात घुसून त्याला ठार करू. सीमेपलीकडील दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याची ताकद भारताकडे आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले होते.