नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद आता आणखी चिघळला असून युद्ध सुरू झालं आहे. भारतातील अनेक विद्यार्थी हे अद्यापही युक्रेनमध्ये अडकून राहिले आहेत. त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी सध्याच्या तणावामुळे युक्रेन आणि रशियाच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला तर त्याची किंमत संपूर्ण जगाला मोजावी लागेल असं म्हटलं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या अगोदर उत्तर प्रदेशच्या चंदौली येथे जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं आहे.
राजनाथ सिंह यांनी "बहुतेक देश रशियाकडून तेल आणि वायू आयात करतात. रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू राहिल्यास आणखी त्रास होईल. जगातील बहुतेक देश रशियाकडून तेल आणि वायू आयात करतात. अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले आहेत" असं म्हटलं आहे. तसेच "जर त्यांच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम झाला तर त्याची किंमत संपूर्ण जगाला मोजावी लागेल आणि भारत यातून सुटणार नाही" असं देखील म्हटलं आहे.
"भाजपा जनतेचा विश्वास तोडत नाही, आश्वासने पूर्ण करतो; सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार"
"भाजपा कधीही जनतेचा विश्वास तोडत नाही आणि दिलेली आश्वासने पूर्ण करतो" असंही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सांगितलं. जौनपूरच्या मल्हानी आणि चंदौलीच्या चकिया विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणूक प्रचारसभांना संबोधित करताना सिंह यांनी दावा केला की, गेल्या 35-40 वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये एकाही पक्षाने सलग दोन वेळा सरकार स्थापन केले नाही, पण भाजपा सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"भाजपाचं सरकार आल्यास होळी आणि दिवाळीला मोफत गॅस सिलिंडर आणि विद्यार्थिनींना स्कूटी"
काही दिवसांपूर्वी राजनाथ सिंह यांनी मोठं आश्वासन दिलं होतं. भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास होळी आणि दिवाळीला मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली. याशिवाय विद्यार्थिनींना स्कुटी देणार असल्याचीही घोषणा राजनाथ सिंह यांनी केली होती. मनकापूरमधून भाजपाने आपल्या विद्यमान आमदार रमापती शास्त्री यांच्यावरच विश्वास टाकत तिकिट दिलं आहे. शास्त्री सध्याच्या योगी सरकारमध्ये मंत्री देखील आहेत. राजनाथ सिंह यांनी जनसभेला संबोधित करताना "दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला तेव्हा सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्यात आला. भाजपा देशाला निराश करणार नाही. भाजपा देशाच्या सन्मानासोबत कोणतीही तडजोड करत नाही. ब्रह्मोसची निर्मिती उत्तर प्रदेशमध्ये होईल. हे एक असं क्षेपणास्त्र आहे ज्याला शत्रू घाबरतो" असं म्हटलं होतं.