ऑनलाइन लोकमत
नोएडा, दि. 07 - नोएडामध्ये सोशल ट्रेडच्या नावाखाली 3 हजार 700 कोटींच्या घोटाळ्यात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांचे मुख्य प्रवक्ते सुरेंद्र कुमार यांनी केला आहे. हा घोटाळा एब्वेज इन्फो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सोशल ट्रेडच्या नावाखाली केल्याचे उघड झाले आहे.
ज्या कंपनीने लोकांना कोटींचा गंडा घातला, त्या कंपनीचा आरोपी असलेल्या संचालकासोबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह चर्चा करतात, असे प्रवक्ते सुरेंद्र कुमार यांनी म्हटले आहे. तसेच, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि कंपनीचा संचालक यांच्यात काही कागदपत्रांची देवाण-घेवाण करणारा फोटो सुद्धा प्रदर्शित केला आहे.
ज्याप्रकारे गृहमंत्री राजनाथ सिंह या कंपनीच्या संचालकासोबत कागदपत्रांची देवाण-घेवाण करत आहेत. त्यावरुन स्पष्ट होते की, या घोटाळ्यात भाजपा सुद्धा सामील आहे. भाजपाच्या नेत्यांसोबत आपली ओळख वाढवून त्यांनी जनतेचा पैसा लुटला आहे, असेही सुरेंद्र कुमार म्हणाले. याचबरोबर भाजपाने विधानसभा निवडणुकीत सुद्धा मोठ्याप्रमाण पैसा खर्च केल्याचा आरोप सुद्धा सुरेंद्र कुमार यांनी केला आहे.