नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान झाल्यास चांगले होईल असं विधान केलं होतं त्यानंतर या विधानावरुन विरोधकांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदींचा इतका पुळका का असा सवाल उपस्थित केला होता. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जर इमरान खान यांचे खरचं मोदींवर प्रेम असेल तर पाकिस्तानच्या जमिनीवर दहशतवादाचा उगम होणार नाही, दहशतवाद्यांना थारा देण्याचं काम पाकिस्तान करणार नाही. दहशतवादाचा मुळासकट उखडून काम पाकिस्तान करेल असं विधान केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे.
यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानने आपल्या जमिनीवर दहशतवादाला बळ देऊ नये. पाकिस्तान दहशतवादाचा प्रश्न सोडविण्यासाठी गंभीरतेने विचार करत असेल तर भारतदेखील पाकिस्तानला दहशतवादाचा सामना करण्यासाठी मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दहशतवाद दहशतवादच असतो. त्याला जाती, धर्म आणि प्रांत असा काही नसतं. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही जागतिक पातळीवर राष्ट्रांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र काँग्रेसने आमच्या दहशतवादाच्या लढाईला कमकुवत केलं आहे. जवानांच्या धाडसावर, ध्येर्याचे कौतुक करणं गुन्हा आहे का? फक्त निवडणुकीच्या वेळी नाही तर आम्ही प्रत्येकवेळी जवानांच्या पराक्रमेचं कौतुक करतो. भाजपाने कधीच कोणाच्या देशभक्तीवर संशय घेतला नाही असंही राजनाथ सिंह यांनी सांगितले.
गेल्या वर्षी पाकिस्तानात सत्तांतर झाले. त्यानंतर पाकिस्तान आणि भारत याच्यातील संबंध सुधारतील, तसेच काश्मीरमुद्दा निकाली निघेल, अशी शक्यता निर्माण आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा बिघडले आहेत. एवढंच काय, तर भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यात आले. महिनाभरापूर्वी परदेशी पत्रकारांनी भारतातील लोकसभा निवडणुकीबाबत आपल्याला काय वाटतं? असा प्रश्न इमरान खान यांना विचारला होता. त्यावेळी भारत-पाक या दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी आणि काश्मीर मुद्द्याचं निरसन करण्यासाठी निवडणुकीनंतर भारतात नरेंद मोदी पुन्हा पंतप्रधान बनले तर चांगले राहील असं वक्तव्य केलं होतं.