ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - हरियाणातील दलित कुटुंबाच्या घरास उच्चवर्णीयांनी लावलेल्या आगीत दोन लहान मुले जळून मृत्युमुखी पडण्याच्या घटनेस ‘एखाद्या कुत्र्यावर कोणीतरी दगड मारण्याची’ उपमा देणारे केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंग यांना गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी फटकारले. ' आपण सत्ताधारी पक्षाचे नेते आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवून कोणतेही मत व्यक्त करण्यापूर्वी सजग राहिले पाहिजे' असे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. ' कोणतेही वक्तव्य करताना, कोणीही त्याचा विपर्यास करू शकणार नाही याची खबरदारीही आपण घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
व्ही.के.सिह यांच्या वक्तव्यामुळे देशभरातील वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे केंद्रीय मंत्री किरण रिजीजू हेही उत्तर भारतीयांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अडचणीत सापडले आहेत. उत्तर भारतीयांना नियमभंग करण्यात अभिमान वाटतो, ्से रिजीजू यांनी म्हटले होते. त्या दोघांवरूनही विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत संबंधित मंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्ही.के. सिंग व रिजीजू यांची कानउघडणी केली.
' व्ही.के. सिंग व किरण रिजीजू यांनी आपल्या वक्तव्यानंबद्दल आधीच स्पष्टीकरण दिले आहे. मात्र कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी नेत्यांनी आपण सत्ताधारी पक्षात असल्याचे भान ठेवले पाहिजे. आपल्या बोलण्याचा कोणीही विपर्यास करू शकणार नाही याविषयी सजग राहूनच एखाद्या मुद्यावर मत व्यक्त केले पाहिजे', असे ते म्हणाले. 'आम्ही काहीच चुकीचे बोललोच नव्हतो, असे सांगून आपण आपला बचाव करू शकत नाही, प्रत्येकाने विचार मांडताना सावधानता बाळगलीच पाहिजे ' अशी सूचनाच त्यांनी सर्व वाचाळवीर नेत्यांना केली आहे.
सिंग यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करा - आझम खान
दलित जळीतकांडाच्या घटनेस 'कुत्र्यावर दगड मारण्याची' उपमा देणारे मंत्री व्ही.के. सिंग यांनी दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा भंग केला असून त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केली आहे.
व्ही.के. सिंग हे मोदींच्या मार्गावरच चालत आहेत, अशी टीकाही आझम खान यांनी केली. ते ( व्ही.के.सिंग) त्यांच्या नेत्यांकडूनच (मोदी) अशी भाषा आणि संस्कृती शिकले आहेत. बादशहाने गोध्रा हत्याकांडात मारल्या गेलेल्यांची तुलना कुत्र्याच्या पिल्लाशी केली आणि आता त्यांचे मंत्री दलितांची तुलना कुत्र्याशी करत आहेत. हे मंत्री बादशहाचे विचारच पुढे नेत आहेत, यात काहीच नवीन नाही असे सांगत आझम खान यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला.