नवी दिल्ली : लडाखच्या पूर्व भागात असलेल्या पँगॉंग लेक परिसरावरून भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये समेट झाली असून, परस्पर सहमतीने सैन्य मागे घेतले जात आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. ते राज्यसभेत बोलत होते. (rajnath singh statement in rajya sabha on india china lac dispute)
भारत आणि चीन सीमेवरील सद्यस्थितीबाबत राज्यसभेत सरकारने निवेदन द्यावे, अशी मागणी केली गेली होती. त्यानुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी भारत आणि चीन सीमेवर तोडगा निघाला असून, दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यास सुरुवात झाली आहे, अशी घोषणा यावेळी बोलताना केली. (india china lac dispute) सन १९६२ च्या पूर्वीपासून भारताच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाचा भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या संबंधावर प्रभाव पडल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
पँगाँग सीमेवरून सहमती
भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये पँगाँग सीमेवरून सहमती झाली आहे. एप्रिल २०२० च्या पूर्वीची स्थिती कायम ठेवली जाणार आहे. चीनने आतापर्यंत या भागात केलेले बांधकाम जमीनदोस्त केले जाणार आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. भारत-चीन तणावादरम्यान ज्या जवानांनी हौतात्म्य पत्करले, त्यांना देश सलाम करेल. देशाच्या अखंडतेसाठी संपूर्ण संसद एकसंध असल्याचेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले.
चिनी सैन्याच्या माघारीला लडाखमधून सुरुवात
सीमेवर शांतता नांदण्याला प्राधान्य
भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करून सीमेवर शांतता नांदावी, याला प्राधान्य देण्यात आले आहे. आम्ही एकही इंच जमीन कोणालाही देणार नाही. चीनकडून गतवर्षी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा या भागात करण्यात आला होता. त्यावरून भारतीय सैन्याने चीनविरोधात पुरेशी कारवाई केली आहे. सप्टेंबर महिन्यापासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. परिस्थिती पूर्वीसारखी असावी, हे आमचे ध्येय आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
चर्चेच्या नवव्या टप्प्यात सहमती
भारत आणि चीनच्या कमांडर स्तरावर झालेल्या नवव्या टप्प्यातील चर्चेत दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या सहमतीनुसार दोन्ही देशांचे सैन्य पँगाँग लेकच्या उत्तर आणि दक्षिण भागातून मागे हटण्यास सुरूवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पँगाँग लेकच्या फिंगर ४ येथे दोन्ही देशांकडून पेट्रोलिंग केली जाणार नाही. या भागाला 'नो पेट्रोलिंक झोन' म्हणून घोषित करण्यात आले आहे. चिनी सैन्य फिंगर ८ आणि भारतीय सैन्य धन सिंह थापा पोस्ट म्हणजेच फिंगर २ वरून फिंगर ३ वर मागे येणार आहे.
दरम्यान, सीमेवरील परिस्थितीबाबत २४ जानेवारी रोजी भारत आणि चीनमध्ये नवव्या टप्प्यातील चर्चा पार पडली. यावेळी दोन्ही देशांच्या सीमा परिसरातून सैनिकांची माघार घेण्याची प्रक्रिया अधिक जलद करण्यावर आणि पूर्व लडाख क्षेत्रात परिस्थिती नियंत्रणात आणि स्थिर करण्यावर एकमत झाले. भारतीय लष्कराने ही बाब सकारात्मक असल्याचे सांगितले होते. याव्यतिरिक्त दोन्ही बाजूंनी चर्चा सुरूच राहतील. तसेच तणाव कमी करण्यासाठी दहाव्या टप्प्याची चर्चाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.