नवी दिल्ली: मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्तानं सरकारमधील मंत्री त्यांच्या कामांची माहिती देत आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही त्यांच्या कामाची दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गृह मंत्रालयानं चार वर्षांत केलेल्या कामांची माहिती यामधून देण्यात आली आहे. या व्हिडीओचं वैशिष्ट्य म्हणजे, बहुचर्चित व्हिडीओ गेम 'सुपर मारियो'च्या धर्तीवर हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. यामध्ये राजनाथ यांना 'मारियो'च्या जागी दाखवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सव्वा दोन मिनिटांच्या व्हिडीओत राजनाथ 2014 मध्ये गेमची सुरुवात करताना दिसतात. त्यावेळी राजनाथ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि त्यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षानं लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आणि एकहाती सत्ता काबीज केली. यानंतर नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाया, ईशान्य भारतातील मोहिमा, भारत के वीर यासारख्या योजना आणि त्यांना मिळालेलं यश व्हिडीओतून अधोरेखित करण्यात आलं आहे. या व्हिडीओत राजनाथ मारियोप्रमाणेच एक-एक आव्हान पार करताना दिसत आहेत.
Video: 'सुपर मारियो'च्या रुपात राजनाथ सिंह; सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 5:59 PM