नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर लोकांचे हाल सुरू असल्याने त्या निर्णयाच्याविरोधात शिवसेनेने विरोधकांशी हातमिळवणी केल्याने भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळेच रागावलेल्या सेनेची समजूत काढण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून संवाद साधला.बुधवारी रात्री सिंग यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. तृणमूल काँग्रेसने बुधवारी नोटाबंदीविरोधात दिल्लीत काढलेल्या मोर्च्यात आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे गेलेल्या प्रादेशिक पक्षांच्या शिष्टमंडळात शिवसेनेचे खासदार सहभागी होते. त्याआधीपासून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून केंद्रावर जोरदार टीका होत आहे.संसदेचे अधिवेशन सुरू असताना विरोधकांच्या गोटात मित्रपक्ष होणे भाजपाला परवडणारे नाही. त्यामुळे राजनाथ यांनी उद्धव यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. काळा पैसा आणि दहशतवाद्यांमार्फत वापर होत असलेल्या बनावट नोटांच्या विरोधात आपण एकत्रित लढायला हवे, असे त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना सांगितले.जनतेचा त्रास लवकर संपावा, यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचेही राजनाथ सिंग यांनी ठाकरे यांच्या कानावर घातले. उद्धव ठाकरे यांनीही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी बोलताना नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र या निर्णयाच्या अमलबजावणीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राजनाथ सिंगनी काढली उद्धव ठाकरे यांची समजूत
By admin | Published: November 18, 2016 1:29 AM