मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. देशातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संरक्षण प्रमुख आणि तीनही दलाचे प्रमुख तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत एक महत्वपूर्ण बैठक घेतली.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी पहलगाम आणि संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीची माहिती संरक्षणमंत्र्यांना दिली. सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पहलगाम हल्ल्याबाबत कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेतील, यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित राहणार आहेत. ही समिती देशाच्या सुरक्षेशी संबंधित निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर पहलगाम हल्ला हा खोऱ्यातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.
हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला, यात एक नवविवाहित नौदल अधिकारी आहेत. तसेच अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचा समावेश होता. तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले होते, त्यापैकी दोघे परदेशी असल्याचे सांगितले जात आहे.
बुधवारी सकाळी गृहमंत्री अमित शहा यांनी हल्ल्याचे ठिकाण असलेल्या बैसरन व्हॅलीला भेट दिली आणि पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली.