नवी दिल्ली : भारतातील इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया अर्थात इसिस या अतिरेकी संघटनेचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. याच प्रयत्नांतर्गत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी देशातील प्रमुख मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेत, मुस्लिम युवांमधील इसिसची लोकप्रियता रोखण्यासाठी त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. या बैठकीनंतर मुस्लिम धर्मगुरूंनी सरकारला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गृहमंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मौलवींना मध्य-पूर्व अतिरेकी गटांच्या कारवाया आणि भारतीय युवकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे या गटांचे प्रयत्न याबाबत माहिती देण्यात आली. या बैठकीस जमियत उलेमा ए हिंदचे राष्ट्रीय सचिव नियाज फारूखी, अजमेर शरीफचे मौलाना अब्दुल वहीद हुसैन चिश्ती, रफीक वारशिक, एम.एम. अन्सारी, एम. जे. खान, शिया धर्मगुरू मौलाना सय्यद कल्बे जव्वाद, कमाल फारुखी, पीस फाऊंडेशन आॅफ इंडियाचे मुफ्ती एजाज अरशद कासमी आणि अन्य उपस्थित होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)
राजनाथ यांची मुस्लिम धर्मगुरूंशी चर्चा
By admin | Published: February 03, 2016 2:50 AM