रजनी पाटील हिमाचल प्रदेशच्या प्रभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:16 IST2018-05-23T01:16:32+5:302018-05-23T01:16:32+5:30
राहुल गांधी यांनी केली नियुक्ती; गुजरातसाठी सचिव

रजनी पाटील हिमाचल प्रदेशच्या प्रभारी
नवी दिल्ली : राज्यसभेच्या माजी खासदार रजनी पाटील यांची काँग्रेसने हिमाचल प्रदेशच्या प्रभारी म्हणून मंगळवारी नियुक्ती केली. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची जागा त्या घेतील. याशिवाय बिहार आणि गुजरातसाठी दोन-दोन सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुशीलकुमार शिंदे हेही महाराष्ट्रातीलच आहेत आणि पूर्वी त्यांनी संघटनेत महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. शिंदे आणि रजनी पाटील हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय समजले जातात.
काँग्रेसचे महासचिव अशोक गेहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. बिहारसाठी वीरेंद्र सिंह राठौर आणि राजेश लिलोठिया यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जितेंद्र बघेल आणि विश्वरंजन मोहंती यांची गुजरातसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांनी पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी नदीम जावेद यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी खुर्शीद अहमद सय्यद अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष होते. या सर्व नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
राहुल गांधी यांनी तरुण नेत्यांना पुढे आणण्याबाबत पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात संकेत दिले होते. मात्र, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना दिलासा दिला होता की, पक्षात त्यांना काही धोका नसेल. परंतु त्यानंतरही श्ािंदे यांना हटविण्यात आले आहे. यापूर्वी अंबिका सोनी, जनार्दन व्दिवेदी, बी.के. हरिप्रसाद, दिग्विजय सिंह यांना महत्वपूर्ण पदांवरुन बाजूला करण्यात आले आहे. राहुल गांधी यांचे लक्ष सध्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या निवडणुकांवर केंद्रीत आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात समित्यांच्या निुयक्त्या करताना दिग्विजय सिंह यांना राज्याच्या समन्वय समितीचे अध्यक्षपद दिले आहे. १३ सदस्यांच्या समितीमध्ये रामेश्वर नीखरा आणि महेश जोशी यासारख्या जुन्या नेत्यांचाही समावेश आहे तर निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्षपद ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिले आहे. त्यांच्यासोबत कांतिलाल भूरिया, अरुण यादव यासारख्या १४ लहान मोठ्या नेत्यांचा यात समावेश आहे. निवडणुकीची रणनीती आणि योजना समितीचे अध्यक्षपदी सुरेश पचौरी आहेत. जाहीरनामा तयार करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात राजेंद्र सिंह अध्यक्ष असतील. त्यांना साथ देणाऱ्यात मीनाक्षी नटराजन यांचा समावेश आहे.
राहुल गांधी यांनी सल्लागार समिती आणि मीडिया व प्रसार समितीचीही स्थापना केली आहे. यात पाच आणि चार सदस्य आहेत. मीडिया समितीत मानक अग्रवाल, पंकज चतुर्वेदी आणि पंकज शर्मा यांचा समावेश आहे़