नवी दिल्ली - वरिष्ठ आयपीएस अधिकारी रजनीकांत मिश्रा हे सीबीआय संचालकपदाचा पदभार स्वीकारतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. रजनीकांत मिश्रा हे यूपी कॅडरच्या 1984 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या रजनीकांत मिश्रा यांच्याकडे सीमा सुरक्षा बला(बीएसएफ)चा पदभार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीची आज बैठक होणार असून, नव्या सीबीआय संचालकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मोदी निवड समितीचे अध्यक्ष असून, न्यायमूर्ती सिक्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे हो दोन सदस्य आहेत. सीबीआयच्या नवीन प्रमुखांच्या नियुक्तीसंदर्भात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील शुक्रवारी (1 फेब्रुवारी) पार पडलेल्या निवड समितीच्या दुसऱ्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नव्हता. त्यामुळे सीबीआयच्या नवीन संचालकांची नियुक्ती आज होण्याची शक्यता आहे.