जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील बद्दल गावात रहस्यमय आजारामुळे झालेल्या १७ जणांच्या मृत्यूमागचं गुढ अखेर उकललं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांनी या मृत्यूमागे ऑर्गनोफॉस्फेट नावाचं रसायन एक मोठं कारण असू शकतं, अशी शक्यता वर्तवली आहे. या केमिकलचा वापर हा कीटकनाशकांमध्ये केला जातो. गावातील रुग्णांना एट्रोपिन इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली, त्यावरून डॉक्टरांनी हा निष्कर्ष काढला आहे. एट्रोपिन इंजेक्शनचा वापर हा ऑर्गनोफॉस्फेटपासून तयार झालेल्या विषावर उपचार म्हणून केला जातो.
डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णाच्या स्थितीमध्ये सुधारणा पाहून या मृत्यूंमागे ऑर्गनोफॉस्फेट हे कारणं असू शकते, अशी शंका आमच्या मनात निर्माण झाली. मात्र हा केवळ प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी पाणी आणि भोजनाच्या नमुन्यांसह रुग्णांकडून घेण्यात आलेल्या नमुन्यांचीही तपासणी केली जात आहे. तपासणी अहवाल समोर आल्यानंतरच योग्य कारणांबाबत निर्णय घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.
मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून जम्मू काश्मीरमधील बद्दल गावामध्ये आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण तीन कुटुंबांमधील होते. तसेच त्यांच्या आजाराचं लक्षण ताप, श्वास घेण्यास त्रास आणि घाम हे होते. ११ रुग्णांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यापैकी ३ बहिणींना सोमवारी रुग्णालयातून सोडण्यात आले. ऑर्गनोफॉस्फेट हे रसायन सर्वसाधारणपणे पिकांना किडींपासून वाचवण्यासाठी वापरलं जातं. हे रसायन प्राण्यांमधील तंत्रिका संकेतांच्या प्रसारणाला रोखते, त्यामुळे ते जीवघेणे ठरू शकते.
या प्रकरणाच्या तपासासाठी एक आंतर मंत्रालयी पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने जानेवारीच्या सुरुवातीला पीडित गावाचा दौरा केला होता. मात्र या पथकाचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. जम्मू-काश्मीर प्रशासनाने याबाबत देशातील प्रमुख उपचार संस्थांची मदत घेतली आहे. तसेच मृत्यूंची संख्या वाढू लागल्याने डॉक्टरांची पथके या गावात पाठवली होती. तसेच हे मृत्यू अन्नविषबाधेमुळेही झालेले असू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात होती.