नवी दिल्ली - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न उचलणारे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी जम्मूकाश्मीरच्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी जाणार आहेत. येत्या ४ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देशातील विविध शेतकरी संघटनांतर्फे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी राजू शेट्टी दिल्लीत आले होते. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, तेथील शेतकऱ्यांची स्थिती अंत्यत गंभीर आहे. राज्यघटनेतील ३७० चे कलम रद्द केल्यानंतर तेथील शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद तुटला आहे. देशाला सफरचंद पुरविणाऱ्यां या प्रदेशातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाली आहे. जम्मू-काश्मीरच्या शेतकऱ्यांकडे २० लाख सफरचंद साठलेला आहे. हे सफरचंद घ्यायला कुणीही तयार नाही. यामुळे तेथील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाली आहे. या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण येत्या काही दिवसात जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे. तेथील शेतकऱ्यांशी संवाद केल्यानंतर राज्य व केंद्र सरकारला त्याची माहिती देऊ. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल पत्र लिहिले आहे. परंतु कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.जम्मू-काश्मीरच्या शेतकऱ्यांचे सर्व अर्थव्यवस्था एकाच पिकावर अवलंबून आहे. सफरचंदचे पीक घ्यायला कुणी व्यापारी तयार नसेल तर त्यांना मोबदला मिळणार नाही. सरकारने बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी खुली करावी नाहीतर राज्य वा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी खासदार शेट्टी यांनी केली.शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीमहाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबद्दल बोलताना शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष द्यायला राज्य व केंद्रातील नेत्यांना वेळ कुठे आहे? यापूर्वीही कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये महापुराने मोठे नुकसान झाले. तेव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदी वा केंद्रातील नेते आले नव्हते. केंद्र व राज्य दोन्ही सरकारला शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नाही. काँग्रेसच्या सरकारला किमान शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती होती. शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दाखवायला सुद्धा हे सरकार तयार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राजू शेट्टी जम्मू-काश्मीरला जाणार, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 6:23 PM