नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत बुधवारी एक मोठी चूक झाली. पंजाब दौऱ्यात फिरोजपूर येथे मोदींच्या उपस्थित एक मोठी रॅली होणार होती. पण निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटाने मोदींचा ताफा रस्त्यामध्येच थांबवला. एका उड्डाणपुलावर जवळपास 15 ते 20 मिनिटं मोदींची गाडी अडकली होती. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही सर्वात मोठी चूक असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. याच दरम्यान अनेकांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) याने देखील एक व्हिडीओ शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे.
राजू श्रीवास्तवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. "नेहमी लक्षात ठेवा, जंगलातला सिंह एकदा जखमी झाला की संपूर्ण जंगल शांत होऊन जातं. अरे काँग्रेसवाल्यांनो तुम्ही मोदीजींचे काही वाकडे करू शकत नाही. कारण मोदीजींवर गुरू, गुरुनानक देव, बाबा विश्वनाथ, बाबा केदारनाथ, बाबा महाकाल यांचा आशीर्वाद आहे. नकली शेतकऱ्यांना पुढे करुन पंजाबची बदनामी का करता? आपल्या पंतप्रधानांना अपमानित करत आहात? तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे" असं व्हिडीओमध्ये राजू श्रीवास्तवने म्हटलं आहे.
"पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी हेतू अयशस्वी ठरले"
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (BJP Smriti Irani) यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. "भारताच्या इतिहासात आज पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी हेतू अयशस्वी ठरले. काँग्रेसमधील जे लोक मोदींचा द्वेष करतात, ते आज देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या सुरक्षेला कशाप्रकारे भंग करता येईल, यासाठी प्रयत्नशील होते" असं म्हणत स्मृती इराणी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच "पंतप्रधान कोणत्या मार्गाने एका ठिकाणी पोहचतात, त्या संपूर्ण मार्गाच्या सुरक्षेची व्यवस्था आणि कोणतीही अडचण नाही असे आश्वासन पंजाब पोलिसांनी पंतप्रधानांच्या सुरक्षा दलाला दिले होते."
"जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठीचा एक स्टंट आहे"
"पंतप्रधानांच्या सुरक्षा दलास जाणूनबुजून खोटं बोललं गेलं का? पंतप्रधानांच्या संपूर्ण ताफ्याला जेव्हा अडवण्याचा प्रयत्न झाला, 20 मिनिटांपर्यंत जेव्हा त्यांची सुरक्षा भंग केली गेली. ज्या लोकांनी पंतप्रधांनांची सुरक्षा भंग केली. त्या लोकांना पंतप्रधानांच्या गाडीपर्यंत त्या ठिकाणापर्यंत कोणी आणि कसं पोहचवलं?" असं म्हणत स्मृती इराणी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया देत मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठीचा एक स्टंट आहे" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी "केंद्र सरकार म्हणते की सुरक्षेत त्रुटी होती आणि पंजाब सरकार म्हणते की पंतप्रधान तिथे गेले नाहीत कारण त्यांच्या रॅलीतील खुर्च्या रिकाम्या होत्या. दोघेही केवळ स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधानांनी तिथे जायला नको होतं" असं म्हटलं आहे.