नवी दिल्ली: संसदेत काल घडलेल्या घटनेवरुन दिल्लीत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. संसदेतील सुरक्षेतील त्रुटींवरून विरोधक सातत्याने सरकारवर निशाणा साधत आहेत. आज विरोधकांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. तर सभागृहात गोंधळ घातल्याने तृणमृल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना निलंबित करण्यात आले आहे.
लोकसभा सचिवालयाकडून ८ कर्मचारी निलंबित; सुरक्षेतल्या चुकीबद्दल केली कारवाई
राज्यसभेत गोंधळ घातल्याने डेरेक ओब्रायन यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. काल संसदेत घडलेल्या घटनेवरुन डेरेक ओब्रायन यांनी सभागृहाच्या वेलमध्ये प्रवेश केला, घोषणाबाजी केली आणि सभागृहाचे कामकाज विस्कळीत केले. त्यामुळे त्याला अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. याबाबत राज्यसभेचे अध्यक्षांनी सभागृहात माहिती दिली.
लोकसभेच्या सभागृहात विरोधी पक्षाच्या खासदारांनीही या घटनेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर काल सभागृहात जे काही घडले त्याबद्दल आपण सर्वजण चिंतित आहोत. सभागृहाची सुरक्षा ही लोकसभा सचिवालयाची जबाबदारी आहे, असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना सभागृहात अराजकता पसरवू नका, असे आवाहन केले. ते म्हणाले की, कालच्या घटनेची जबाबदारी लोकसभा सचिवालयाची आहे. मी तुमच्याशी बसून चर्चा करेन. कालही चर्चा झाली. पुन्हा चर्चा करणार. सरकारचा याच्याशी काहीही संबंध नाही. सचिवालयाच्या कामात सरकार हस्तक्षेप करत नाही, आम्ही करू देणार नाही, असंही ओम बिर्ला यांनी सांगितले.
दरम्यान, संसदेच्या सुरक्षेमध्ये मोठा गोंधळ झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संसद परिसरात मोठा पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची सुरक्षा दल कसून तपासणी करत आहे. इतकेच नाही तर बुधवारी लोकसभा सचिवालयाने खासदारांना नवीन इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची 'स्मार्ट कार्ड' तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाकडून लोकसभा आणि राज्यसभा लॉबी आणि संसदेच्या संकुलातील इतर काही ठिकाणी फेशियल रेकग्निशन सिस्टीमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती लोकसभा सचिवालयाकडून देण्यात आली. सचिवालयाने म्हटले आहे की, अनेक सदस्यांकडे स्मार्ट कार्ड आहेत, ज्यांनी व्हिजिटर्स मॅनेजमेंट सिस्टमसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती करून घ्यावी. याशिवाय पुढील आदेश येईपर्यंत व्हिजिटर पास बनविण्यास बंदी घालण्यात आली आहे. संसदेच्या आत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. टोपी व बूट काढून तपासणी केली जात आहे.